इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत (मराठीत) लिहिण्याची पद्धत !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘मराठी, हिंदी, गुजराती आदी संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच आहे. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य आहे. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘कोणते शब्द जोडून न लिहिता सुटे लिहावेत आणि ते तसे का लिहावेत ?’, यांविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात ‘इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत (मराठीत) कशा प्रकारे लिहावेत ?’, हे जाणून घेऊ. (लेखांक १४ – भाग १)

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

१. इंग्रजी भाषेतील स्वर आणि व्यंजने यांच्यातील परस्पर संबंधांवर त्यांचे देवनागरी लिपीतील व्याकरण अवलंबून असणे

इंग्रजी भाषेची लिपी ‘रोमन’ आहे, तर मराठी भाषेची लिपी ‘देवनागरी’ आहे. मराठीत लेखन करतांना काही वेळा आपल्याला इंग्रजी शब्द लिहावे लागतात. ‘रोमन’ लिपीतील हे शब्द ‘देवनागरी’ लिपीत (मराठीत) कशा पद्धतीने लिहावेत ?’, हे जाणून घेण्यासाठी प्रथम इंग्रजीतील स्वर आणि व्यंजने यांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेत ‘ए’, ‘इ’, ‘आय’, ‘ओ’ आणि ‘यू’ (रोमन लिपीत लिहायचे, तर ‘a’, ‘e’, ‘i’, ‘o’ आणि ‘u’) हे पाच स्वर आहेत अन् अन्य एकवीस व्यंजने आहेत. हे स्वर आणि व्यंजने विविध प्रकारे एकत्र येऊन वेगवेगळे शब्द सिद्ध होतात. देवनागरी लिपीत त्यांचे व्याकरण त्यांच्या एकत्र येण्याच्या पद्धतींनुसार पुढीलप्रमाणे लिहावे.

१ अ. इंग्रजी शब्दातील व्यंजनापुढे एकच स्वर येणे : इंग्रजी शब्दातील व्यंजनापुढे एकच स्वर येत असेल, तर ते व्यंजन मराठीत र्‍हस्व लिहावे, उदा. ‘bi’ हे मराठीत ‘बि’ असे र्‍हस्व लिहावे. या नियमानुसार इंग्रजीतील ‘Video (चलच्चित्र)’ या शब्दामधील ‘Vi’ हे मराठीत ‘व्हि’, ‘de’ हे ‘डि’ आणि ‘o’ हे ‘ओ’ असे लिहावे. अशा प्रकारे ‘Video’ हा शब्द मराठीत ‘व्हिडिओ’ असा लिहावा. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत. त्यांमधील इंग्रजी शब्दांपुढे कंसात त्यांचे मराठीत अर्थ दिले आहेत.

१ आ. इंग्रजी शब्दातील व्यंजनापुढे एकाहून अधिक स्वर येणे : इंग्रजी शब्दातील व्यंजनापुढे एकाहून अधिक स्वर येत असतील, तर ते व्यंजन मराठीत दीर्घ लिहावे, उदा. ‘Fee’ हे मराठीत ‘फी’ असे दीर्घ लिहावे. इंग्रजीतील ‘Clean (स्वच्छ)’ या शब्दामधील ‘Cl’ या अक्षरांपुढे ‘e’ आणि ‘a’ हे दोन स्वर आले आहेत. त्यामुळे ‘Clean’ हा शब्द मराठीत लिहितांना त्यातील ‘क्ली’ दीर्घ लिहावा आणि पूर्ण शब्द ‘क्लीन’ असा लिहावा. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत. त्यांमधील इंग्रजी शब्दांपुढे कंसात त्यांचे मराठीत अर्थ दिले आहेत.

अपवाद : ‘book’ हा शब्द या नियमाला अपवाद आहे. यामध्ये ‘oo’ असे दोन इंग्रजी स्वर एकापुढे एक आले असले, तरी प्रचलित मराठी भाषेनुसार ‘बुक’ या शब्दातील ‘बु’ र्‍हस्व लिहावा. याचप्रमाणे ‘look’ हा शब्दही ‘लुक’ असा लिहावा.

१ इ. इंग्रजी शब्दातील शेवटच्या व्यंजनापुढे येणारा स्वर उच्चारला न जाणे : इंग्रजीतील ‘Line (रेष)’ या शब्दातील ‘L’ या व्यंजनापुढे ‘i’ हा स्वर आला आहे आणि ‘n’ या व्यंजनापुढे ‘e’ हा स्वर आला आहे; मात्र या शब्दाचा उच्चार ‘लिने’ असा होत नाही, तर ‘लाईन’ असा होतो. या उच्चारामध्ये ‘n’च्या पुढे आलेल्या ‘e’ या स्वराचा उच्चार होत नाही; पण तो स्वर त्या शब्दात आहे. त्यामुळे हा शब्द देवनागरी लिपीत लिहितांना ‘न’च्या आधीचा ‘ई’ दीर्घ होतो आणि ‘लाईन’ असा लिहिला जातो. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत. त्यांमधील इंग्रजी शब्दांपुढे कंसात त्यांचे मराठीत अर्थ दिले आहेत.

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०२२)