गोमांस खात असल्यामुळे अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाकालेश्‍वर मंदिरात जाण्यापासून रोखले !

अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया (डावीकडे)

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथे ६ सप्टेंबरच्या रात्री अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट हे महाकालेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीचा रस्ता अडवल्यामुळे ते मंदिरात दर्शन न घेता परत गेले. रणबीर कपूर याने ‘मी गोमांस खातो’ए असे विधान केल्याच्या पार्श्‍वभूमीवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचा रस्ता अडवला होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत काळे झेंडे दाखवले. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३५३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट हे त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रसारानिमित्त देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत आहेत.

१. ‘प्रशासनाने रणबीर कपूर आणि आलिया भट यांना महाकालेश्‍वराच्या दर्शनासाठी मंदिरात येण्याचे आवाहन केले; मात्र या दोघांनाही विरोध झाल्यामुळे ते गाडीतून खाली उतरले नाही आणि माघारी गेले’, असे सांगितले जात आहे. (गोमांस खाऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना मंदिरात दर्शनासाठी का बोलावले ? प्रशासनाने प्रथम याचे उत्तर द्यावे ! – संपादक) ‘या काळात पोलिसांनी विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना मार्गातून हटवले होते’, असेही सांगितले जात आहे.

२.  चित्रपटाचे दिग्दर्शक आर्यन मुखर्जी यांनी मात्र या वेळी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याची माहिती येथील पुजारी आशिष पुजारी यांनी सांगितले.

रणबीर कपूर यांनी काय म्हटले होते ?

वर्ष २०११ मध्ये रणबीर कपूर याने ‘रॉकस्टार’ चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या वेळी ‘मला गोमांस खायला आवडते. माझे कुटुंब पाकिस्तानच्या पेशावरचे आहे. त्यामुळे त्यांच्यासमवेत पेशावरी खाद्यसंस्कृतीही येथे आली आहे. मी मटण खातो. मी गोमांसचा चाहता आहे’, असे सांगितले होते. त्या वेळचा हा व्हिडिओ आता पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. त्यावरून रणबीर याला विरोध केला जात आहे.

संपादकीय भूमिका

हिंदू आता जागृत झाल्यामुळे ते आता अशा प्रकारे वैध मार्गाने विरोध करून त्यांच्या धार्मिक भावनांची नोंद घेण्यास भाग पाडत आहेत, हे कौतुकास्पद आहे !