सुटे लिहायचे काही शब्द आणि त्यामागील दृष्टीकोन !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘मराठी, हिंदी, गुजराती आदी संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच आहे. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य आहे. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘क्रियापदे’ आणि ‘धातू’ यांची थोडक्यात ओळख करून घेतली. आजच्या लेखात ‘कोणते शब्द जोडून न लिहिता सुटे लिहावेत आणि ते तसे का लिहावेत ?’, यांविषयी जाणून घेऊ.  

(लेखांक १३)

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

१. शब्दांना सुटे करणारा ‘विशेषण-विशेष्य संबंध’ !

१ अ. परस्परांशी ‘विशेषण’ आणि ‘विशेष्य’ असा संबंध असणारे दोन शब्द जोडून न लिहिता सुटे लिहिणे : आपण यापूर्वीच्या लेखांमध्ये पाहिले आहे की, ‘वाक्यातील नामाविषयी विशेष माहिती सांगणार्‍या शब्दाला ‘विशेषण’ असे म्हणतात आणि ते विशेषण ज्या नामाविषयी विशेष माहिती देते, त्या नामाला ‘विशेष्य’ असे म्हणतात.’ ‘दिव्य’ आणि ‘दृष्टी’ हे दोन शब्द जोडून ‘दिव्यदृष्टी’ असा एक शब्द अनेकदा लिहिला जातो. वास्तविक या शब्दामध्ये ‘दिव्य’ हे विशेषण आहे, तर ‘दृष्टी’ हे विशेष्य आहे. ‘विशेषण आणि विशेष्य सुटे लिहावेत’, या नियमानुसार हे शब्द ‘दिव्य दृष्टी’ असे सुटे लिहावेत.

वरील उदाहरणातील ‘दृष्टी’ या विशेष्याला ‘अधू’, ‘वाईट’ अशी अन्य विशेषणे लावली, तर ते शब्द ‘अधू दृष्टी’, ‘वाईट दृष्टी’ असे वेगवेगळे लिहिले जातात. ‘अधूदृष्टी’, ‘वाईटदृष्टी’ असे जोडून लिहिले जात नाहीत. या धर्तीवर मराठीतील अनेक ‘विशेषणे’ आणि ‘विशेष्ये’ सुटी लिहिण्याचे धोरण आपण स्वीकारले आहे.  याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अमृत महोत्सव, अती महत्त्वाचे, उच्च देवता, उच्च शिक्षण, दिव्य ज्ञान, दिव्य वाणी, कनिष्ठ देवता, क्षुद्र देवता, परात्पर गुरु, परात्पर गुरुपदी,उच्च लोक, बाह्य मन इत्यादी.

१ आ. तत्सम शब्द मराठीत लिहितांना त्यांना ‘विशेषण-विशेष्य संबंधा’चा नियम लावणे : ‘उच्चस्तरीय’ हा तत्सम, म्हणजे संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आलेला शब्द आहे. संस्कृतमध्ये हा शब्द जोडून लिहिला जातो. त्यामुळे प्रचलित मराठीतही तो तसाच लिहिला जातो. आपण मात्र त्यात पालट केला आहे. ‘उच्चस्तरीय’ या शब्दातील ‘उच्च’ हे विशेषण आहे. ‘स्तरीय’ या विशेष्याला मराठी प्रतिशब्द ‘स्तराचा’ हा आहे. मराठीत ‘उच्च स्तराचा’ असे सुटे शब्द लिहिले जातात. ‘स्तरीय’ आणि ‘स्तराचा’ या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. त्यामुळे ‘उच्चस्तरीय’ या तत्सम शब्दाला ‘विशेषण-विशेष्य संबंधा’चा नियम लावून तो ‘उच्च स्तरीय’ असा सुटा लिहायचे आपण ठरवले आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत. उच्च वर्णीय, उच्च वर्गीय, उच्च शिक्षित इत्यादी.

१ इ. ‘जयंती’ हा शब्द सुटा लिहिणे : ‘गांधी जयंती’ या शब्दप्रयोगात ‘गांधी’ हा शब्द विशेषण आहे आणि ‘जयंती’ हे त्याचे विशेष्य आहे. त्यामुळे वरील ‘सूत्र क्र. १ अ’मध्ये दिलेल्या नियमानुसार हे दोन्ही शब्द सुटे लिहावेत. याच प्रकारे कूर्म जयंती, मत्स्य जयंती, वाल्मीकि जयंती इत्यादी सर्व शब्द सुटे लिहावेत.

१ इ १. अपवाद : ‘दत्तजयंती’ आणि ‘शिवजयंती’ हे दोन शब्द या नियमाला अपवाद आहेत. हे शब्द जोडून लिहिणे सर्वत्र प्रचलित असल्यामुळे आपणही ते जोडून लिहिणे स्वीकारले आहे.

२. श्रीविष्णु, श्रीराम आणि श्रीकृष्ण या तीन देवतांच्या नावांतील ‘श्री’ वगळता अन्य सर्व देवतांच्या नावांपूर्वी लावण्यात येणारा ‘श्री’ सुटा लिहावा !

३. ‘समवेत’ हा शब्द सुटा लिहिणे योग्य असणे

काही शब्द जोडून लिहिल्यास ते पहायला चांगले वाटत नाहीत, उदा. माझ्यासमवेत, त्यांच्यासमवेत इत्यादी. त्याखेरीज प्रचलित मराठी लिखाणात ‘समवेत’ हा शब्द सुटा लिहिण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आपणही तो सुटा लिहिण्याचा पर्याय स्वीकारला आहे. त्यानुसार वरील शब्द ‘माझ्या समवेत’ आणि ‘त्यांच्या समवेत’ याप्रमाणे सुटे लिहावेत.

४. ‘भर रस्त्यात’ हे शब्द सुटे असणे : सध्या प्रचलित असलेल्या मराठी भाषेत ‘भर रस्त्यात’ हे शब्द काही ठिकाणी जोडून अथवा सुटे लिहिले जातात. यांपैकी आपण ‘भर रस्त्यात’ असे सुटे लिहिण्याचे धोरण निश्चित केले आहे. याप्रमाणे ‘भर मंडईत’, ‘भर पावसात’, ‘भर चौकात’ इत्यादी शब्द सुटे लिहावेत.’

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२२)