ठाणे येथील नामवंत शास्त्रीय गायक पं. निषाद बाक्रे यांनी जाणून घेतले महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य !

ठाणे येथील पं. निषाद बाक्रे हे शास्त्रीय संगीतातील नामवंत गायकांपैकी एक आहेत. त्यांनी डॉ. राम देशपांडे, पं. उल्हास कशाळकर, पं. दिनकर कैकिणी, डॉ. अरुण द्रविड आणि पं. मधुकर जोशी या गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे. ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या तिन्ही घराण्यांची गायकी आत्मसात् करून त्यांनी त्या घराण्यांचे एकत्रीकरण केले आणि त्यात कल्पकता अन् कलात्मकता आणण्याचा सुविद्य प्रयत्न केला आहे. पं. निषाद बाक्रे यांनी २२ ऑगस्ट २०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत त्यांचे शिष्य श्री. श्रीरंग दातार आणि श्री. साहिल भोगले हेही उपस्थित होते. पं. निषाद बाक्रे आणि त्यांचे शिष्य यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी आतापर्यंत केलेल्या संशोधन कार्याविषयी माहिती दिली. पं. बाक्रे आणि त्यांचे शिष्य यांनी सगळे संशोधन जिज्ञासेने जाणून घेतले. २५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या येथील वास्तव्याच्या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पं. बाक्रे यांच्या गायनाचे सादरीकरण इत्यादी विविध प्रकारचे संशोधनाचे प्रयोग आयोजित करण्यात आले.

​गायनसाधना

पं. निषाद बाक्रे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेण्यासाठी आलेले पं. निषाद  बाक्रे यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमालाही भेट देऊन तेथील कार्य जाणून घेतले. आश्रम पहातांना पं. निषाद बाक्रे यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे पाहूया.

डावीकडून श्री. श्रीरंग दातार, श्री. साहिल भोगले आणि पं. निषाद बाक्रे यांना सात्विक कलाकृतींविषयी माहिती देतांना अधिवक्ता योगेश जलतारे

१. पं. बाक्रे पुष्कळ जिज्ञासू असून त्यांनी सर्व आश्रम आत्मियतेने पाहिला. त्यांनी साधनेविषयीही शंका विचारल्या.

२. आश्रमात चैतन्यामुळे झालेले विविध पालट पहातांना त्यांच्याशी संबंधित सूक्ष्म प्रयोगांची उत्तरे ते आणि त्यांचे शिष्य यांनी अचूक जाणली, उदा. वायुतत्त्व प्रयोग, लादी गुळगुळीत लागणे, त्रासदायक आणि चांगली स्पंदने जाणवणे, इत्यादी.

३. पं. बाक्रे यांना येथील ध्यानमंदिरात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा जाणवली आणि त्यांना ‘मंदिरात आल्यासारखे वाटले. तेथून जावेसे वाटत नव्हते’, असे त्यांनी सांगितले.

४. सनातनचे कलेशी संबंधित सर्व संशोधन कसे केले जाते ? हेही त्यांनी बारकाईने जाणून घेतले.

५. पं. बाक्रे यांनी त्यांना आलेले अनुभवही सांगितले, तसेच विविध ठिकाणी गायन करतांना तेथील स्पंदने निरनिराळी असतात, हेही त्यांनी अनुभवले असल्याचे सांगितले.

६. पं. बाक्रे यांनी ‘संगीताचा सराव कसा करावा?’, याविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना मार्गदर्शन केले. याविषयी सांगतांना ‘‘मला त्या वेळी विचार न करताही या विषयावर सांगण्यासाठी अनेक सूत्रे उत्स्फूर्तपणे सुचली. हा या स्थानी असलेल्या सकारात्मक ऊर्जेचाच परिणाम आहे’’, असे त्यांनी सांगितले.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२३.८.२०२२)

 ‘मी इथे (आश्रमात) आलो ते खूप बरे झाले. नाहीतर मी एका चांगल्या गोष्टीपासून वंचित राहिलो असतो.’ – श्री. श्रीरंग दातार (पं. निषाद बाक्रे यांचे शिष्य )

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीताविषयी करण्यात आलेल्या संशोधनात्मक प्रयोगाची क्षणचित्रे !

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. निषाद बाक्रे यांनी केलेल्या ‘भूप’ या रागाच्या गायनाचा संत, तसेच आध्यात्मिक त्रास नसलेले अन् त्रास असलेले साधक यांच्यावर झालेला परिणाम

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

२३.८.२०२२ या दिवशी ‘ठाणे येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. निषाद बाक्रे यांनी केलेल्या ‘भूप’ या रागाच्या गायनाचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाच्या वेळी पं. बाक्रे यांना तबल्यावर गोवा येथील प्रसिद्ध तबलावादक डॉ. उदय कुलकर्णी आणि संवादिनीवर (हार्माेनियमवर) श्री. दत्तराज म्हाळशी यांनी साथ दिली. या वेळी पं. बाक्रे यांचे २ शिष्य श्री. श्रीरंग दातार आणि श्री. साहिल भोगले यांनी त्यांना गायनासाठी अन् तानपुर्‍यावर साथ केली.

परिचय

१. तबलावादक डॉ. उदय कुलकर्णी : यांनी पं. निषाद बाक्रे यांना तबल्यावर साथ केली. ते ‘गोवा कॉलेज ऑफ म्युजिक’मध्ये साहाय्यक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) आहेत. त्यांना पं. सोमशेखर, पं. रवींद्र यावगल आणि पं. सूरज पुरंदरे या गुरूंचे मार्गदर्शन लाभले आहे. ते ‘ऑल इंडिया रेडिओ’चे ‘ए’ ग्रेड कलाकार आहेत.

२. संवादिनीवादक श्री. दत्तराज म्हाळशी : यांनी पं. निषाद बाक्रे यांना संवादिनीवर (हार्माेनियमवर) साथ केली. ते मूळचे पणजी (गोवा) येथील आहेत. त्यांनी ‘संवादिनी’वादनात MPA (Master In Performing Art) ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांना पं. गुलाब टेंगसे, पं. राया कोरगावकर आणि पं. सुधीर नायक या तीन गुरूंचे मार्गदर्शन प्राप्त झाले.

३. पं. निषाद बाक्रे यांचे शिष्य श्री. श्रीरंग दातार आणि श्री. साहिल भोगले : हे दोघे पं. निषाद बाक्रे यांच्याकडे अनुक्रमे १३ आणि १२ वर्षांपासून गायन शिकत आहेत.

१. पं. निषाद बाक्रे यांनी केलेल्या ‘भूप’ या रागाच्या गायनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

१ अ. संतांना आलेल्या अनुभूती

१ अ १. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

अ. ‘भूप राग ऐकतांना मला थंडावा जाणवला.

आ. गायनाची स्पंदने मला माझ्या मूलाधारचक्रापर्यंत पोचल्याचे जाणवले. माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

इ. वातावरणात पुष्कळ चैतन्य पसरल्याचे जाणवले, तसेच वातावरण प्रकाशमान झाल्याचेही जाणवले.

ई. त्यानंतर गायनामुळे माझ्या स्वाधिष्ठानचक्राच्या ठिकाणी स्पंदने जाणवली.

उ. वातावरणात शक्तीची स्पंदने जाणवली.

ऊ. गायन द्रुत गतीने चालू झाल्यावर सहस्रारचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवून माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

१ अ २. एक संत

अ. ‘गायन आणि वादन यांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

आ. प्रारंभी मला भाव आणि चैतन्य जाणवले.

इ. पं. निषाद बाक्रे यांनी शेवटी गायलेल्या ‘तराणा’ (टीप) या प्रकारामुळे वातावरणात अधिक प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

टीप – या गायनप्रकारात अर्थपूर्ण काव्याचा वापर न होता ‘नादीर’, ‘तन’, ‘दिम्’, ‘तोम्’, अशा नादमधुर; परंतु अर्थ नसलेल्या शब्दांचा वापर होतो. तराणा मध्य आणि द्रुत लयीत गातात.

१ आ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेला आलेली अनुभूती

१ आ १. गायन ऐकून मन निर्विचार होणे आणि हलके वाटणे : ‘प्रयोगापूर्वी माझ्या मनात पुष्कळ विचार होते. मला जडपणा जाणवत होता; मात्र पं. निषाद बाक्रे यांनी गायलेला भूप राग ऐकून माझे मन निर्विचार झाले. मला पुष्कळ हलके वाटले.’ – कु. म्रिण्मयी केळशीकर

१ इ. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेला आलेली अनुभूती

१. ‘पं. निषाद बाक्रे यांच्या गायनातून मला चैतन्य जाणवले.

२. त्यांच्या केवळ गळ्यातूनच आवाज येतो, असे नाही; तर ‘त्यांच्या धमन्याधमन्यांतून स्वर बाहेर पडत आहेत’, असे मला जाणवले.

३. ‘त्यांच्या गायनाचा प्रभाव केवळ गायन केलेल्या स्थळापुरता मर्यादित नव्हता, तर त्या स्थळाबाहेरील डोंगर, झाडे आणि वातावरण यांवरसुद्धा होत आहे’, असे जाणवत होते.

४. मला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीला काही करण्याची / गायनातून मिळणार्‍या चैतन्याशी लढण्याची शक्तीच शिल्लक राहिलेली नव्हती.

५. मी आतापर्यंत अनेकांचे गायन ऐकले आहे; परंतु मला कुणाचेही स्वर किंवा ताना ऐकायला मिळाल्या नव्हत्या. हे सर्व अनिष्ट शक्तींनी दिलेल्या त्रासामुळे होत होते; मात्र या वेळी माझा आध्यात्मिक त्रास घटल्याने किंवा मला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीला काहीही करता न आल्याने मला खर्‍या अर्थाने स्वरांचा आस्वाद घेता आला.’

–  एक साधिका

२. पं. निषाद बाक्रे यांच्या गायनाचा गायक, वादक आणि प्रेक्षक यांच्यावर ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणांचा निष्कर्ष

२ अ. गायकावर झालेला परिणाम : शास्त्रीय गायक पं. निषाद बाक्रे यांच्यातील नकारात्मक ऊर्जा ५१ टक्क्यांनी न्यून झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा ८४१ टक्क्यांनी वाढली.

२ आ. वादकांवर झालेला परिणाम : पं. निषाद बाक्रे यांना साथ करणारे तबलावादक डॉ. उदय कुलकर्णी आणि संवादिनीवादक श्री. दत्तराज म्हाळशी यांच्यातील नकारात्मक ऊर्जा ४० ते ५० टक्क्यांनी न्यून झाली अन् त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि तिची प्रभावळ अनुक्रमे ८.९६ मीटर अन् ८.७५ मीटर होती.

२ इ. एका श्रोत्यावर झालेला परिणाम : एका साधक-श्रोत्यातील (कु. म्रिण्मयी  केळशीकर यांच्यातील) नकारात्मक ऊर्जा ६५ ते ७८ टक्क्यांनी न्यून झाली आणि तिच्यातील सकारात्मक ऊर्जा २८२ टक्क्यांनी वाढली.

३. निष्कर्ष

‘भारतीय शास्त्रीय संगीतात मुळातच सात्त्विकता असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम गायक, वादक आणि प्रेक्षक यांवरही होतो; तसेच भारतीय संगीतामध्ये गायक, वादक अन् प्रेक्षक यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून करण्याची क्षमतासुद्धा आहे’, हेही या प्रयोगाच्या निष्कर्षांमधून स्पष्ट होते. त्यामुळेच पं. निषाद बाक्रे यांनी सुरांशी एकरूप होऊन केलेल्या भावपूर्ण शास्त्रीय गायनाचा परिणाम सगळ्यांवर अधिक प्रमाणात सकारात्मक झाल्याचे लक्षात येते.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.८.२०२२)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.