युरोपात दुष्काळामुळे हाहा:कार !

  • १.७ कोटी लोकांना फटका

  • भारताएवढ्या भूभागात दुष्काळ !

लंडन (इंग्लंड) – ब्रिटनसहित पूर्ण युरोपात प्रचंड उष्णता आणि अल्प पर्जन्यवृष्टी यांमुळे हाहा:कार माजला आहे. युरोपच्या जवळपास ६० टक्के भूभागावर दुष्काळसदृश परिस्थिती ओढवली आहे. हे क्षेत्रफळ भारताच्या क्षेत्रफळाएवढे आहे.

यामुळे युरोपातील १ कोटी ७० लाख लोकांना फटका बसला आहे. ‘येणार्‍या काही दिवसांत आणखी १ कोटी ५० लाख लोकांना अशा संकटांना सामोरे जावे लागू शकते’, असे सांगितले जात आहे. इंग्लंडमध्ये वर्ष १९७६ नंतर प्रथमच एवढा तीव्र दुष्काळ पडला आहे. ‘ही परिस्थिती पुढील काही मास राहील’, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे.

नैसर्गिक संकटाची तीव्रता !

♦ दक्षिण इंग्लंडमध्ये वर्ष १८३६ नंतर प्रथमच जुलै मासात सर्वांत अल्प पाऊस पडला.

♦ युनायटेड किंगडममध्ये जुलै मासात केवळ ४६.३ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरी पावसाच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ५३ टक्के आहे.

♦ फ्रान्सचा विचार केल्यास येथे गेल्या मासात केवळ ९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याआधी वर्ष १९५९ मध्ये एवढा अल्प पाऊस पडला होता.

♦ स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांमध्ये उष्णतेने सर्व विक्रम मोडीत काढले. या देशांत जुलै मासात ४० अंश सेल्सियसहून अधिक तापमान नोंदवले गेले. स्पेनमध्ये उष्णतेने तर ६० वर्षांचा विक्रम मोडला.

♦ इंग्लंडमध्ये अशी स्थिती आहे की, काही ठिकाणी पिण्याचे पाणी विकत घेण्यावरून लोकांमध्ये मारामार्‍या होत आहेत.