माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रभक्तीचा जागर !

शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांना राष्ट्रध्वज भेट !

श्री. संदीप नाईक

नवी मुंबई, ६ ऑगस्ट (वार्ता.) – ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम (माजी) आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांना संदीप नाईक यांनी राष्ट्रध्वज भेट दिला, तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होऊन ‘प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवावा’, असे आवाहन केले.‌ या वेळी रोपांचे वितरण करून ‘प्रत्येकाने एक तरी झाड लावून निसर्ग संवर्धनामध्ये हातभार लावावा’, असे आवाहनही संदीप नाईक यांनी केले.

‘समाजकारणाविना राजकारण निरर्थक असल्याने हितचिंतकांनी मला वाढदिवसानिमित्त हारतुरे किंवा पुष्पगुच्छ देऊ नये, तर समाजोपयोगी उपक्रम राबवावेत’, असे आवाहन संदीप नाईक यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक संस्था यांनी आठवडाभर नवी मुंबईमध्ये विनामूल्य आरोग्य पडताळणी शिबिर, गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्वच्छता मोहिमा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम राबवले.

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान भारतात राबवण्यात येत आहे.‌ अभियानाच्या संदर्भात नवी मुंबईमध्ये जनजागृती करण्यात आली.