रांची (झारखंड) येथे धर्मांध पशू तस्करांनी महिला पोलीस उपनिरीक्षकावर गाडी चढवून त्यांना ठार मारले !

उजवीकडे महिला उपनिरीक्षक संध्या टोपनो

रांची (झारखंड) – येथे धर्मांध पशू तस्करांनी संध्या टोपनो या महिला उपनिरीक्षकावर पिक अप वाहन चढवून त्यांना ठार मारल्याची घटना २० जुलैच्या पहाटे घडली. येथे वाहनांची तपासणी करतांना ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून वाहन कह्यात घेतले आहेत. टोपनो यांना घायाळ अवस्थेत रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिमडेगा भागात पशू तस्कर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तुपुदाना भागात टोपनो वाहन तपासणी करत होत्या. त्या वेळी तेथे आलेल्या पिक अप वाहनाला त्यांनी थांबण्यास सांगितले; मात्र वाहन चालकाने गाडी थांबवण्याऐवजी ती टोपनो यांच्यावर चढवली आणि गाडी घेऊन पळून जाऊ लागला. त्या वेळी पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. पुढे जाऊन वाहन उलटले. त्यातील अन्य तस्कर पळून गेले; मात्र चालकाला पकडण्यात आले. पसार झालेल्या तस्करांचा पोलीस शोध घेत आहेत.

संध्या टोपनो यांच्या मृत्यूला पोलीस ठाण्याच्या प्रमुखाचा निष्काळजीपणा कारणीभूत ! – भावाचा आरोप

टोपनो यांचे भाऊ अजित यांनी तुपुदाना पोलीस ठाण्याचे प्रमुख कन्हैया सिंह यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांच्या निष्काळजीपणामुळे संध्या यांचा मृत्यू झाला आहे. संध्या यांनी अनेकदा त्यांना ‘रात्रपाळी देऊ नका’, असे सांगितले होते; तरीही त्यांनी तिचे ऐकले नाही. तपासणी नाक्यावर संध्या यांच्या समवेत अन्य कोणताही अधिकारी नसायचा. तिला आजही एकटीला पाठवण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

या घटनेच्या आदल्या दिवशीच हरियाणा येथे धर्मांध खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकांना अशाच प्रकारे ठार मारल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी अशी घटना धर्मांधांकडूनच घडते, यातून ते पोलिसांना जुमानत नसल्याचे लक्षात येते ! यातून पोलीस, प्रशासन आणि शासनकर्ते योग्य तो बोध घेऊन धर्मांधांवर कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा !