आसाममध्ये पुरामुळे २२ लाख लोक बाधित !

  • आतापर्यंत १७८ ठार

  • १ सहस्र ९३४ गावे पुराच्या विळख्यात

  • ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवर

गौहत्ती (आसाम) – मुसळधार पावसाचा आसाम राज्याला सर्वाधिक तडाखा बसला असून येथे पुरामुळे एकूण २२ लाख लोक बाधित झाले आहेत. राज्यातील ३४ पैकी २७ जिल्ह्यांतील १ सहस्र ९३४ गावे अजूनही पुराच्या विळख्यात आहेत. पूर आणि भूस्खलन यांमुळे मृतांची एकूण संख्या १७४ वर पोचली आहे. ब्रह्मपुत्रा, कोपिली, डिसांग आणि बुर्हिडीहिंग या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

आपत्ती प्रतिसाद दलांकडून साहाय्य कार्य !

पुरामुळे एकूण ५० सहस्र ७१४ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. यासह शेकडो घरे, रस्ते, पूल, सिंचन कालवे आदींचीही हानी झाली आहे. पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल’ आणि ‘राज्य आपत्ती प्रतिसाद दल’ अखंड साहाय्य कार्य करत आहेत.

साहाय्य छावण्यांत २ लाख ७७ सहस्र लोक  !

प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी २३ जिल्ह्यांमध्ये ४०४ साहाय्य छावण्या उभारल्या असून  त्यांमध्ये २ लाख ७७ सहस्र लोकांना रहाण्याची व्यवस्था केली आहे. यासह १३८ साहाय्य केंद्रांद्वारे पूरग्रस्तांसाठी साहाय्य सामग्री पाठवली जात आहे.