वर्ष २०२३ पासून पीओपी मूर्तीवर बंदी घालणार ! – मुंबई महापालिका

मुंबई – वर्ष २०२३ पासून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीवर बंदी घालण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिली आहे. त्यामुळे ‘यंदाच्या गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) कि शाडू मातीच्या मूर्ती असाव्यात’, याविषयीचा संभ्रम दूर झाला आहे.

प्रसिद्धी परिपत्रकात म्हटले आहे की,…

१. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी विभाग कार्यालयांनी वर्ष २०२३ पासून पीओपी मूर्तीवर बंदी घालण्यात येणार असल्याची व्यापक प्रसिद्धी द्यावी.
२. वर्ष २०२२ साठी पीओपीच्या मूर्ती स्वखुशीने टाळून पर्यावरणपूरक साहित्याची मूर्ती खरेदी करावी.
३. यंदा घरगुती पीओपीच्या गणेशमूर्ती आणणे ऐच्छिक असून पीओपीची मूर्ती असल्यास ती केवळ २ फुटांची असावी.

‘पीओपी मूर्तींपेक्षा शाडूच्या मातीच्या मूर्ती पर्यावरणस्नेही असल्याने त्यांचाच वापर करावा’, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने वर्ष २०२० मध्ये दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयानेही ती बंदी योग्यच असल्याचे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी ‘पीओपी’च्या मूर्तीला अनुमती द्यावी’, अशी मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेने वरील परिपत्रक काढले. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.