प्रार्थनास्थळांवरील विनाअनुमती असणाऱ्या भोंग्यांच्या संख्येविषयी नागपूर महापालिका अनभिज्ञ !

नागपूर महापालिका

नागपूर – शहरात अनुमती न घेता किती प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यात आले आहेत, तसेच शहरातील किती धार्मिक स्थळे विश्वस्त संस्थांची आहेत अन् किती नियमित केलेली आहेत, याची माहिती महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही. याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. कोलारकर यांनी महापालिकेकडे ही माहिती मागितली होती.

कोलारकर म्हणाले, ‘‘धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण कधी झाले आणि त्याप्रमाणे किती धार्मिक स्थळे दाखवण्यात आली, यांची माहिती देण्यात आलेली नाही.’’

अनधिकृत १२१ धार्मिक स्थळे !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २ वर्षांपूर्वी शहरातील विविध भागांत अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली होती; मात्र शहरात अजूनही अनधिकृत १२१ धार्मिक स्थळे असल्याची माहिती देण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई चालू केली होती. त्या वेळी २०० हून अधिक धार्मिक स्थळे हटवण्यात आली होती. त्याला विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांकडून विरोध झाल्यानंतर कारवाई थंडावली होती.

संपादकीय भूमिका

  • विनाअनुमती भोंग्यांच्या संख्येविषयी अनभिज्ञ असणाऱ्या नागपूर महापालिकेच्या क्षेत्रात किती अवैध गोष्टी चालत असतील ?
  • अनधिकृत प्रार्थनास्थळांवरील भोंगे आणि अनधिकृत प्रार्थनास्थळे यांची संख्या महापालिकेकडे नसणे, हे प्रशासनाला लज्जास्पद आहे. यामुळे शहरात कुणीही अनधिकृतपणे प्रार्थनास्थळ उभे करू शकतो, इतकी साधी गोष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी येत नाही ? याला उत्तरदायी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी.