काश्मीरमध्ये नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसाठी पाकिस्तान दोषी ! – भारत

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये जम्मू-काश्मीरचे सूत्र पुन्हा एकदा उपस्थित केले. भारताने त्यास सडेतोड प्रत्युत्तर देत म्हटले, ‘नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसारख्या गंभीर अपराधांसाठी उत्तरदायी असणारा देश सातत्याने स्वत:चा बचाव कसा करतो, याचे भारताचा शेजारी देश जिवंत उदाहरण आहे. भारत सीमेपलीकडून चालू असलेल्या आतंकवादाच्या विरोधात सातत्याने ठोस आणि निर्णायक कारवाई चालू ठेवील.’ संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे ‘स्थायी मिशन’च्या सभासद आणि कायदेशीर सल्लागार डॉ. काजल भट्ट यांनी भारताच्या वतीने वरील विधान केले.


भट्ट पुढे म्हणाल्या की, पाकद्वारे पसरवण्यात येणारे असत्य आणि दुष्प्रचार यांना उत्तर देण्यासाठी आम्हाला बाध्य व्हावे लागले; कारण पाकला खोटे बोलण्याची सवय आहे. तत्कालीन पूर्व पाकिस्तानात (आजच्या बांगलादेशात) त्यांनी केलेला नरसंहार पाकचे प्रतिनिधी विसरले आहेत. ५० वर्षांपूर्वी पाकने केलेल्या नरसंहाराचे दायित्व त्याने आजपर्यंत स्वीकारले नाही आणि ना त्याविषयी क्षमा मागितली !