‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या मुख्यालयाला चिनी राजदूताने दिली भेट !

वृत्तपत्राकडून चीनच्या विविध धोरणांचे नेहमीच समर्थन !

चीनचे भारतातील राजदूत सन वेइदॉन्ग (उजवीकडे)

चेन्नई (तमिळनाडू) – चीनचे भारतातील राजदूत सन वेइदॉन्ग हे शहराच्या दोन दिवसीय दौर्‍यावर होते. येथे त्यांनी साम्यवादी विचारसरणी असलेल्या ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या मुख्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी वृत्तपत्राचे संपादक सुरेश नंबथ आणि संपादक मंडळातील अन्य सदस्य यांची भेट घेतली. वेइदॉन्ग यांनी या भेटीचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यांनी लिहिले, ‘द हिंदू’च्या मुख्यालयाला भेट दिली. समोरासमोर बसून अनेक सूत्रांवर चर्चा केली. असे केल्याने आमचा एकमेकांविषयीचा विश्‍वास वृद्धींगत झाला. चीन आणि अन्य सूत्रे यांवर चर्चा करण्यासाठी आपल्या सर्वांचे स्वागत आहे.’ वेइदॉन्ग यांनी ‘द हिंदू’ वृत्तपत्राच्या कामकाजाचे कौतुकही केले.

‘द हिंदू’ वृत्तपत्र हे चीनधार्जिणे असल्याचे नेहमी सांगितले जाते. वृत्तपत्राकडून चीनच्या विविध धोरणांचे नेहमीच समर्थन केले जाते. जुलै २०२१ मध्ये तेथील साम्यवादी पक्ष स्थापन होऊन १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘द हिंदू’ने पक्षासंदर्भातील चिनी भाषेतील पानभर विज्ञापन प्रकाशित केले होते. तसेच ऑक्टोबर २०२० मध्ये ‘द हिंदू’ने चीनच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने एक चिनी विज्ञापन प्रकाशित केले होते. साम्यवाद्यांचा प्रचार करण्याच्या प्रयत्नामध्ये वृत्तपत्राने भारतीय सैनिकांनी केलेल्या बलीदानाच्या दिवशीच चिनी विज्ञापन प्रकाशित केले. हे समोर आल्यावर आयकर विभागाने वृत्तपत्र आणि चीन यांच्यातील आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भात अन्वेषण चालू केले होते.

संपादकीय भूमिका

भारतात लोकशाही असल्याने प्रत्येकाला त्याच्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे राज्यघटनेने स्वातंत्र्य दिले आहे; परंतु शत्रूराष्ट्राच्या हिताचे करण्यात येणारे वार्तांकन निश्‍चितच लांच्छनास्पद आहे ! अशांवर सरकारने कारवाई का करू नये ? कारवाई केल्यास लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आक्रमण केल्याची कुणी आवई उठवली, तर अशांच्या विरोधातही कारवाई होणे अपेक्षित !