सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे अत्युच्च कोटीतील संत सनातनचे ग्रंथ संकलित करत असल्याने ते ग्रंथ म्हणजे साक्षात् चैतन्याचे स्रोतच आहेत. ८ मे २०२२ या दिवशीच्या लेखात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ग्रंथांविषयी असणारा भाव’ आणि ‘ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांचे घडलेले गुणदर्शन’ या पैलूंविषयी पाहिले. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.
लेखांक २ (भाग २)
संकलक : (पू.) संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/577693.html
प्रस्तुत लेखमालेतील सर्व लेख साधकांनी संग्रही ठेवावेत. ग्रंथप्रदर्शने, ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ इत्यादी प्रसंगी जिज्ञासूंचे प्रबोधन करण्यासाठी या लेखमालिकेत दिलेल्या माहितीचा उपयोग होईल. – संपादक
(या संदर्भातील विस्तृत लिखाण सनातनच्या आगामी ग्रंथात प्रकाशित करण्यात येणार आहे. – संपादक) |
२. ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घडलेले गुणदर्शन !
२ उ. संतांशी असलेल्या जवळीकतेमुळे ग्रंथांसाठी विपुल ज्ञानाचा संग्रह : सनातनच्या ग्रंथांत तात्त्विक ज्ञानाच्या जोडीलाच प्रायोगिक ज्ञानही पुष्कळ आहे. हे प्रायोगिक ज्ञान परात्पर गुरु डॉक्टरांनी अधिकतर संतांकडे जाऊन त्यांच्याकडून शिकून घेतले आहे. श्री मलंगशाहबाबा (मुंबई), प.पू. बेजन देसाई (नाशिक) आणि प.पू. श्यामराव महाराज (केर्ले, कोल्हापूर), ही अशा संतांची उदाहरणे आहेत. प.पू. काणे महाराज (नारायणगाव, पुणे) आणि गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (श्रीरामपूर, नगर) यांनी परात्पर गुरु डॉक्टरांवरील प्रेमापोटी स्वतःकडील ज्ञानाचे भांडारच परात्पर गुरु डॉक्टरांसाठी खुले करून दिले. परात्पर गुरु डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू सद्गुरु (कै.) अप्पाकाका (डॉ. वसंत आठवले) हे परात्पर गुरु डॉक्टरांना गुरुस्थानी मानत. त्यांनी आयुष्यभर अत्यंत परिश्रम घेऊन अध्यात्मातील विविध विषयांवर संग्रहित केलेले सर्व ज्ञान परात्पर गुरु डॉक्टरांना सनातनच्या ग्रंथांसाठी देऊन टाकले. त्यांनी स्वतः लिहिलेल्या ‘आयुर्वेद’ आणि ‘मुलांचे संगोपन आणि विकास’ या विषयांवरील सर्व ग्रंथांच्या प्रसिद्धीचे अधिकारही सनातनला दिले !
२ ऊ. ग्रंथ चैतन्यमय होण्यासाठी आणि ग्रंथसेवेच्या माध्यमातून साधकांची साधना होण्यासाठी ग्रंथांची अधिकाधिक सेवा साधकांकडूनच करवून घेणे : १९९५ या वर्षी ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र’ आणि ‘प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण’ हे दोन ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर प.पू. बाबा परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाले होते, ‘‘पैशांनी ही कामे होणार नाहीत.’’ साधक ग्रंथांची सेवा करत असल्याने ग्रंथ अधिक चैतन्यमय होण्यास साहाय्य होते, तसेच ग्रंथसेवेच्या माध्यमातून साधकांची साधनाही होते. यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांनी ग्रंथलिखाणाच्या सेवेपासून ग्रंथवितरणाच्या सेवेपर्यंतच्या बहुतांश सर्व सेवांमध्ये साधकांनाच सहभागी करून घेतले आहे. याच दृष्टीने त्यांनी वर्ष १९९७ मध्ये मडगाव, गोवा येथे सनातन संस्थेचे मुद्रणालयही चालू केले होते. काही अडचणींमुळे ते वर्ष २०१२ पासून बंद करण्यात आले असून आता ग्रंथांची छपाई बाहेरून केली जाते.
२ ए. ग्रंथसेवेशी एकरूप झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले !
२ ए १. ग्रंथ-निर्मितीतील सर्व प्रक्रियांमध्ये सहभाग : ग्रंथासाठी लिखाणाची निवड करणे, संकलन, मुद्रितशोधन, संरचना पडताळणे, मुखपृष्ठांची निर्मिती अशा सर्वच सेवांमध्ये प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष रितीने परात्पर गुरु डॉक्टरांचा सहभाग असतो.
२ ए २. प्रवासातही ग्रंथसेवा : परात्पर गुरु डॉक्टर प.पू. बाबांच्या दर्शनासाठी इंदूरला जात असत किंवा अध्यात्मप्रसारासाठी दौऱ्यावर जात असत, तेव्हा प्रवासातही ते ग्रंथांचे लिखाण आणि मुद्रितशोधन करण्याची सेवा करत असत.
२ ए ३. अत्यंत कठीण शारीरिक स्थितीतही संगणकावर ग्रंथांचे लिखाण पडताळण्याची सेवा अविरत करणे : वर्ष २००७ पासून विविध आजारांमुळे आणि प्राणशक्ती अत्यल्प असल्यामुळे बहुतेक वेळा परात्पर गुरु डॉक्टरांना सलग काही वेळ बसणेही शक्य नसते. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा पलंगावर आडवे पडून ग्रंथसेवा करावी लागते. असे असले, तरी जरा बरे वाटायला लागले किंवा एखादे तातडीचे लिखाण पडताळायचे असेल, तर अत्यंत कठीण अशा शारीरिक स्थितीतही ते संगणकावर ग्रंथांचे लिखाण पडताळण्याची सेवा करण्यासाठी येतात. काही वेळा अगदी बसणेही शक्य नसेल, तर ते आसंदीचा आधार घेऊन उभे राहून लिखाण पडताळण्याची सेवा करतात. सेवा करतांना थकव्यामुळे ग्लानी येत असेल, तर तोंडवळ्यावर (चेहऱ्यावर) पाणी मारणे, लिंबाची गोळी चघळणे आदी कृती करून ते सतत सेवा करण्याचा प्रयत्न करतात.
‘परात्पर गुरु’ पदावर पोचलेल्या महान विभूतीचे सूक्ष्मातून प्रचंड कार्य चालू असतांना त्या विभूतीला खरं तर स्थुलातून कार्य करण्याची काहीच आवश्यकता नसते; मात्र परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच्या आचरणातूनही साधकांपुढे आदर्श निर्माण करत आहेत !
२ ऐ. सर्वस्वाचा त्याग : सनातन संस्थेच्या स्थापनेनंतर आरंभीच्या काळात संस्थेचे कार्य दूरवर पोचले नव्हते. त्यामुळे संस्थेला मिळणारे अर्पण तुटपुंजे होते. ग्रंथ-निर्मितीला आरंभ केल्यानंतरही अर्पणनिधी विशेष नसायचाच. अशा वेळी ग्रंथछपाईसाठी लागणारे पैसे परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच देत असत. याचसह मुंबई येथील सेवाकेंद्र चालवण्यासाठी होणारा प्रतिदिनचा व्यय आणि अन्य अध्यात्मप्रसार कार्यासाठी होणारा व्यय हाही परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच करत असत. असे असतांनाही परात्पर गुरु डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी सेवाकेंद्राची द्वारे साधकांसाठी सदैव उघडी ठेवली आणि सेवेला येणाऱ्या साधकांच्या खाण्या-पिण्यापासून निवासापर्यंतच्या सर्व गोष्टींची प्रेमाने काळजी घेतली.
परात्पर गुरु डॉक्टर आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी अशा प्रकारे सर्वस्वाचा त्याग केला नसता, तर आज सनातन संस्थेचे कार्य आकाशाला गवसणी घालण्याइतके वाढू शकलेच नसते. याचे स्मरण ठेवून साधकांनी नेहमी त्यांच्याप्रती कृतज्ञताभावात रहायला हवे.
(क्रमश: उद्याच्या अंकात)