‘अ‍ॅमेझॉन’कडून भारताचे मानचित्र (नकाशा) आणि राष्ट्रध्वज यांचा सातत्याने अवमान !

‘अ‍ॅमेझॉन’वर त्वरित कारवाई करा ! – सुराज्य अभियान

हे सांगावे का लागते ? पोलीस, प्रशासन आणि सरकार यांनी ते स्वतःहून करणे अपेक्षित आहे ! – संपादक

मुंबई – भारताचा राष्ट्रध्वज आणि भारताचे मानचित्र अर्थात् नकाशा हे कोट्यवधी भारतियांच्या राष्ट्रीय अस्मितेचे विषय आहेत. राष्ट्रध्वजाच्या वापराविषयी ‘ध्वजसंहिते’मध्ये नियम दिलेले आहेत. त्याचे उल्लंघन करणे, हा गुन्हा आहे. तसेच भारताच्या मानचित्राचे  विकृतीकरण करणे, हा देखील गुन्हा आहे. असे असतांना ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापन ध्वजसंहितेचे उल्लंघन करत भारताचा राष्ट्रध्वज छापलेले टी-शर्ट, बूट आदी उत्पादने, तसेच विकृतीकरण केलेले भारताच्या नकाशाचे ‘विनाईल स्टिकर्स’ यांची विक्री त्याच्या संकेतस्थळाद्वारे करत आहे.

‘अ‍ॅमेझॉन’कडून भारताच्या मानचित्राचे विकृतीकरण

यापूर्वी अनेकदा ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाला याविषयी कळवूनही आस्थापनाने काहीही पालट न करता ही विक्री चालूच ठेवली आहे. भारतीय राष्ट्रीय प्रतिकांचा सातत्याने अवमान करणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाचा हा उद्दामपणा आता थांबवायलाच हवा. जोपर्यंत ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापन भारत सरकार आणि भारतीय जनतेची जाहीर क्षमायाचना करत नाही, तोपर्यंत ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनावर बहिष्कार घालावा, असे आवाहन करत भारत सरकारने ‘अ‍ॅमेझॉन’वर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली. या संदर्भात गृहमंत्र्यांना नुकतेच एक निवेदन पाठवण्यात आले आहे.

(समितीचे निवेदन वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

या निवेदनात म्हटले आहे की,

१. पाकव्याप्त आणि चीनव्याप्त काश्मीरचा भूभाग वगळलेल्या भारताचे मानचित्र असलेले विनाईल स्टिकर्स, तसेच अशोकचक्रासह तिरंगा छापलेले टी-शर्ट आणि बूट विकण्याची अ‍ॅमेझॉनची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अ‍ॅमेझॉनने ‘तिरंगा मास्क’, ‘तिरंगा टोपी’ आदी उत्पादनांची विक्री करत राष्ट्रध्वजाची विटंबना केली आहे. काही दिवसांपूर्वी तर ‘अ‍ॅमेझॉन’वर गांजाची विक्री देखील झाल्याचे आरोप झाले होते. यासंदर्भातही हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.

‘अ‍ॅमेझॉन’कडून विक्रीसाठी ठेवलेले भारताचा राष्ट्रध्वज छापलेले टी-शर्ट

२. ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०’च्या कलम २ आणि ५ नुसार, तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१’च्या कलम २ नुसार आणि ‘बोधचिन्ह आणि नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तिन्ही कायद्यांनुसार हे दंडनीय गुन्हे आहेत. त्यामुळे सरकारने अ‍ॅमेझॉनवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. जर सरकारने यानुसार कारवाई केली नाही, तर ‘भारतीय कायदे निरुपयोगी आहेत’, असे चित्र निर्माण होईल आणि राष्ट्रध्वज अन् मानचित्र यांचा कोणीही अवमान करू धजावेल ! हे टाळण्यासाठी भारत सरकारने या गंभीर विषयाची त्वरित दखल घ्यावी, असे आवाहन ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आले आहे.

(ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)