४५ बनावट आधुनिक वैद्यांच्या विरोधात गुन्हे नोंद !

पुणे महानगरपालिकेची कारवाई !

सर्वत्रच्या बनावट आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई हवी ! – संपादक 

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे – राज्य सरकारच्या आदेशान्वये वर्ष २०१७ पासून येथील महापालिकेने बनावट आधुनिक वैद्यांच्या विरोधात मोहीम चालू केली आहे. इतर राज्यांमध्ये वैद्यकीय उपचारांची पदवी घेतलेले; मात्र राज्याच्या ‘मेडिकल कौन्सिल’कडे नोंदणी अथवा नोंदणीचे नूतनीकरण न करता उपचार करणारे, मान्यताप्राप्त नसलेली औषधे देणारे, तसेच ज्या विषयात पदवी घेतली आहे, त्या व्यतिरिक्त अन्य उपचार अथवा शस्त्रकर्म करणार्‍या ४५ आधुनिक वैद्यांच्या विरोधात पुणे महापालिकेने गुन्हे नोंद केले आहेत. पुणे महापालिका स्तरावर महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. नागरिकांकडून आधुनिक वैद्यांच्या संदर्भात येणार्‍या तक्रारी या समितीपुढे ठेवल्या जातात. तक्रारींनुसार पडताळणी करून महापालिकेच्या विधी विभागाकडून संबंधित पोलीस ठाण्यात क्षेत्रीय मेडिकल अधिकाराच्या माध्यमातून गुन्हा नोंद केला जातो. समितीची बैठक ३ मासांतून एकदा घेण्यात येते. त्यात कारवाईविषयी आढावा घेण्यात येतो, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली. (बनावट आधुनिक वैद्य निर्माणच होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – संपादक)