नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका विशेष ‘ऑनलाईन’ संवादाचे आयोजन

झारखंड, बंगाल, आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि बांगलादेश येथील धर्मप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती

धनबाद (झारखंड) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका विशेष ‘ऑनलाईन’ संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला झारखंड, बंगाल, आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि बांगलादेश येथील धर्मप्रेमी ऑनलाईन सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. विकास सिंह यांनी केले.

. श्री. रितेश कश्यप, पत्रकार, पांचजन्य, झारखंड : देशासाठी काही करायचे असेल, तर आपण कोणत्याही प्रतिष्ठेची अपेक्षा करू नये, हा आदर्श नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या आचरणातून आपल्या समोर ठेवला आहे. आज त्याची आवश्यकता आहे.

२. श्री. बिस्वा ज्योति नाथ, महाकाल सेना, आसाम : प्रत्येकाने नेताजींच्या आध्यात्मिक जीवनातून प्रेरणा घेतली पाहिजे.

३. अधिवक्ता राजेश चौबे, बंगाल : आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने नेताजींशी संबंधित पुरावे सार्वजनिक केले नाहीत आणि ते भविष्यातही सार्वजनिक होतील, असे वाटत नाही. यासाठी आपल्यालाच (हिंदूंनाच) प्रयत्न करावे लागेल.

४. श्री. दिम्बेश्वर शर्माजी, इंफाळ, मणिपूर : मणिपूर आणि नेताजी यांचे जवळचे नाते आहे. त्यांनी स्वातंत्र्याची घोषणा मणिपूरमध्येच केली होती, हे फार अल्प लोकांना ठाऊक असेल.

५. श्री. रूपमचंद्र सरकार, गाझीपूर, बांगलादेश : नेताजींचे संपूर्ण चरित्र समजणे कठीण आहे, एवढे ते महान आहेत. केवळ भारतातच नाही, तर आजही बांगलादेशमधील हिंदूंच्या मनातही त्यांच्या प्रती दृढ श्रद्धा आहे.

६. श्री. अनिर्बान नियोगी, भारतीय साधक समाज, बंगाल : आम्हाला ‘देदी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल’ असा खोटा इतिहास शिकवला जात आहे. प्रत्यक्षात स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद सेनेच्या ६० सहस्र सैनिकांपैकी २४ सहस्र सैनिकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिलेली आहे. भारतातील सर्व क्रांतीकारकांमध्ये नेताजी ‘अल्टीमेट’ (उत्तम) होते; कारण इंग्रजांना देशातून बाहेर काढल्याविना रहाणार नाही, असा त्यांचा दृढ निश्चय होता.

७. श्री. विजय यादव, श्रीकृष्ण सेना, बंगाल : सध्याच्या परिस्थितीमध्ये हिंदु जनजागृती समिती सर्व संघटनांना एकत्रित करण्याचे अतिशय कौतुकास्पद कार्य करत आहेत. आम्हा सर्वांना स्वत:ला मोठे दाखवण्याची मानसिकता सोडून देऊन समितीच्या नेतृत्वाखाली एकत्रित आले पाहिजे. एका नेतृत्वाखाली पुढे गेलो, तरच आपण यशस्वी होऊ शकतो.

८. श्री. सुमन घोष, अगरतळा, त्रिपुरा : जर आम्ही स्वामी विवेकानंद यांच्या आदर्शानुसार नेताजींच्या स्वप्नातील भारत निर्माण केला, तर जगातील कोणतीच शक्ती त्याच्याशी लढू शकणार नाही. हे लक्षात घेऊन आपल्याला कार्य करण्याची आवश्यकता आहे.

क्षणचित्र

कार्यक्रम एक घंट्याचा होता; परंतु कार्यक्रमाचा विषय आवडल्यामुळे अनेक धर्मप्रेमी कार्यक्रम संपल्यावरही ४० मिनिटे ऑनलाईन थांबले होते. वक्त्यांच्या भाषणानंतर काही धर्मप्रेमींनी समितीच्या कार्याचे कौतुक केले, तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी हिंदूंमध्ये जागृती होत असल्याचे सांगितले.

नेताजींच्या आत्मसमर्पणाचे तत्त्वज्ञान आणि ईश्वराचे अधिष्ठान या बळावर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देणे आवश्यक ! – श्री शंभू गवारे, पूर्व एवं पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. शंभू गवारे

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आत्मसमर्पणाचे तत्त्वज्ञान आणि ईश्वराचे अधिष्ठान यांच्या बळावर कार्य करण्याची प्रेरणा घेऊन आपल्याला हिंदु राष्ट स्थापनेच्या कार्यात योगदान वाढवण्याची आवश्यकता आहे. नेताजींची प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता, सातत्य, दृढता, पराक्रमाची पराकाष्ठा आणि मोठे संघटन कौशल्य या गुणांना आपल्याला जीवनामध्ये उतरवण्याची आवश्यकता आहे.