सिंध आणि बलुचिस्तान यांना पाकपासून स्वतंत्र करा !

पाकमधील राजकीय पक्ष ‘मुत्ताहिदा कौमी मूवमेंट’चे अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांची संयुक्त राष्ट्रे, भारत आणि ब्रिटन यांच्याकडे मागणी

‘मुत्ताहिदा कौमी मूवमेंट’चे अध्यक्ष अल्ताफ हुसेन

लंडन (ब्रिटन) – पाकिस्तानच्या कह्यात असणारे सिंध आणि बलुचिस्तान यांना स्वतंत्र करा, अशी मागणी पाकमधील राजकीय पक्ष मुत्ताहिदा कौमी मूवमेंटचे (एम्.क्यू.एम्.चे) अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांनी संयुक्त राष्ट्रे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय संसद आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. अल्ताफ हुसेन यांच्यावर पाकमध्ये शेकडो गुन्हे नोंद असल्याने ते अनेक वर्षांपासून लंडनमध्ये रहात आहेत.

अल्ताफ हुसेन यांनी म्हटले आहे की,

१. पाकच्या कह्यातील या दोन्ही प्रदेशांतील लोकांची स्थिती दयनीय आहे. ते साहाय्यासाठी संयुक्त राष्ट्रे, ब्रिटन आणि भारत यांच्याकडे पहात आहेत. भारतासमेवत अन्य शेजारी देशांमध्ये आतंकवादी पाठवणार्‍या पाकने या दोन्ही प्रातांना तालिबान, इस्लामिक स्टेट, लष्कर-ए-झंगवी, लष्कर-ए-तोयबा आदी आतंकवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रयस्थान निर्माण केले आहे. बलुचिस्तान चीनला विकण्यात आले आहे.

२. भारताची झालेली फाळणी ही जगातील मानवी इतिहासातील सर्वांत मोठी चूक होती. यामुळे केवळ भूगोलच पालटला नाही, तर लाखो लोकांचे विस्थापन आणि महिलांवर अत्याचार झाले.

३. जर सिंध आणि बलुचिस्तान स्वतंत्र झाले, तर आम्ही युरोपीय संघाप्रमाणे भारतासमवेत एकसंघ बनवून राहू.