अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाला अतीक्रमण झालेले दिसत नाही कि चिरेखाण व्यावसायिकांशी प्रशासनातील संबंधितांचे आर्थिक लागेबांधे आहेत ?
मालवण – तालुक्यातील ओवळीये, धनगरवाडी ते हेदुळ या मुख्य रस्त्यावर चिरेखाण व्यावसायिकांनी केलेले अतीक्रमण ४ दिवसांत हटवून रस्ता पूर्ववत् करावा अन्यथा रस्ताबंद आंदोलन करून उपोषण केले जाईल, अशी चेतावणी ओवळीये, धनगरवाडी येथील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, धनगरवाडी येथे जवळपास २०० ते २५० लोकवस्ती आहे. धनगरवाडीत जाण्यासाठी हेदूळ मुख्य रस्त्यापासून दुसरा रस्ता जोडलेला आहे. या रस्त्यावर गेल्या २ दिवसांपासून २ चिरेखाण व्यावसायिकांनी अतीक्रमण करून धनगरवाडीकडे जाणार्या रस्त्यावर चिरेखाण व्यवसाय चालू केला आहे. त्यामुळे रहदारीला मोठी अडचण निर्माण झाली आहे. धनगरवाडीला जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण झाले आहे.
ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे.