समष्टी श्रीकृष्णभक्ती हवी !

संपादकीय

पदाचा उपयोग करुन प्रशासकीय व्यवस्था सुधारणे ही समष्टी श्रीकृष्णभक्तीच !

अधिकारी भारती अरोरा

भारतीय पोलीस सेवेतील (आय.पी.एस्.) अधिकारी भारती अरोरा यांनी श्रीकृष्णाची भक्ती करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांनी हरियाणा सरकारकडे केलेल्या अर्जात ‘पुढील आयुष्यभर भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायची आहे’, असा उल्लेख केला आहे. श्रीकृष्णाची भक्ती करण्यासाठी जीवन समर्पित करणे, हा चांगलाच भाग आहे. आपल्याकडे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे ४ आश्रम आहेत. एखाद्या प्रदेशावर राज्य करणारा राजा हा त्या राजाचा राजपुत्र वयात आल्यावर, त्याला पुरेशी जाण आल्यावर, त्याला राज्यकारभारातील सर्व बारकावे सांगून स्वत: वानप्रस्थ अथवा संन्यासाश्रम स्वीकारायचा. येथे महत्त्वाचे सूत्र म्हणजे राजकुमार सक्षम झाल्यावरच राजा त्याचे पद सोडत असे. यातून व्यावहारिक आयुष्य जगल्यावर, उर्वरित आयुष्य ईश्वर चिंतनात निमग्न होऊन मोक्षप्राप्ती साध्य करण्यासाठी साधना करण्याचा राजाचा हेतू असे.

कलियुगांतर्गत चालू असलेल्या सध्याच्या कलियुगात जर राज्याचा, राज्यव्यवस्थेचा विचार केला, तर ‘‘चांगली स्थिती आहे’, असे आपण कधीतरी म्हणू शकतो का ? कुठल्या विभागाविषयी चांगले म्हणू शकतो का ? अगदी तळागाळापर्यंतची व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे. विद्यमान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, आमची (म्हणजे मंत्र्यांची) काम करण्याची सिद्धता आहे; मात्र अधिकारी आम्हाला दाद देत नाहीत. जिथे मंत्र्यांना अधिकारी दाद देत नाहीत, तिथे सर्वसामान्यांची काय कथा ? जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी ‘सध्याचे सरकारी अधिकारी म्हणजे कुंभकर्णाचे अवतार !’ असे विधान एका खटल्याच्या प्रकरणी केले होते. ही सर्व उदाहरणे येथे सांगण्याचे कारण म्हणजे सध्याची शासन व्यवस्था आणि त्याचा मोठा भाग असणारी प्रशासकीय व्यवस्था यांची स्थिती तेथे वर्षानुवर्षे कामचुकारपणा करणारे, जनतेची कामे न करणारे, जनतेशी नीट न वागणारे, स्वत: शासनकर्ता असण्याच्या थाटात वावरणार्‍या सहस्रो अधिकार्‍यांनी गांजलेली आहे. यात काही चांगले अधिकारी आहेत आणि ते प्रामाणिकपणे त्यांचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करतही आहेत; मात्र त्यांना त्यांचे बक्षीस हे वारंवार होणार्‍या स्थानांतरांच्या (बदल्यांच्या) स्वरूपात मिळते अथवा चौकशांचा ससेमिरा लागण्याच्या स्वरूपात मिळते. ‘जनता हाच जनार्दन आहे’, अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. व्यष्टी रूपातील देवाच्या मूर्तीत व्यक्त होणारा श्रीकृष्ण समष्टी स्वरूपात सर्व वस्तूंत, रूपांमध्ये आणि जनतेच्या रूपातही आहे. व्यष्टीपेक्षा समष्टी हित महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या वेतनाच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या ब्रिटिशांच्या नोकर्‍या सोडून स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी क्रांतीकार्यात उडी घेतली. आता देश स्वतंत्र झाला आहे; मात्र व्यवस्था पारतंत्र्याप्रमाणे भासते. ही व्यवस्था पालटण्यासाठी उच्च विद्याविभूषित आणि मोठ्या पदावरील व्यक्तींनी आता त्यांची व्यक्तीगत उपासना करत कंबर कसणे आवश्यक आहे. एकदा का अधिकारी सुधारले, तर प्रस्थापित व्यवस्था सुधारील, व्यवस्था सुधारल्यामुळे जनतेतील जनार्दन प्रसन्न झाला की, समष्टीतील श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळून त्यांची भक्ती लवकर फलद्रूप होईल, हेच खरे !