मुंबई – मी आत्महत्या करणार्यांचे नेतृत्व करत नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महामंडळाच्या कर्मचार्यांना केले. कर्मचार्यांचे प्रतिनिधित्व करणार्या एका शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी राज ठाकरे यांनी भेटीच्या प्रारंभी आत्महत्या न करण्याची अट कर्मचार्यांच्या प्रतिनिधींसमोर ठेवली.
या वेळी कर्मचारी म्हणाले, ‘विलीनीकरणाविषयी हाती काहीच आले नाही, तर काय करणार ? यासाठी अगोदर आयोग लागू करा आणि नंतर विलीनीकरण करा, अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारच्या निर्वाचनाला जे वेतन देता, तेच आम्हाला द्या. सरकार विलीनीकरणाच्या संदर्भात तीन आठवडे मागत आहे. आम्ही एक मास द्यायला सिद्ध आहोत. आम्ही महाराष्ट्राची सेवा करतो; पण प्रत्येक वेळी आमच्याच वेतनाच्या वेळी पैसे कसे नसतात ? १२ दिवसांच्या संपानंतर विलीनीकरण समिती स्थापन झाली. न्यायालयाचा पुढची दिनांक आला आणि हाती काही लागले नाही, तर घरी काय सांगायचे ?’’
‘हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव मांडून तो केंद्र सरकारकडे पाठवून विलीनीकरण करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा’, अशी मागणी कर्मचार्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. ‘विलीनीकरणाविषयी सरकारसमवेत चर्चा करू’, असे आश्वासन राज ठाकरे यांनी कर्मचार्यांना दिले.