सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात निवासासाठी असतांना श्री. रवि भूषण गोयल यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. रामनाथी आश्रमात आलेल्या चांगल्या अनुभूती

अ. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहिल्यावर ते पुष्कळ प्रसन्न दिसत होते आणि ‘ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटत होते. माझ्या कार्यालयातही परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आहे. मी त्यांच्या छायाचित्राची पूजा करतांनाही ‘ते हसत आहेत’, असे मला वाटते.

आ. मला इंदूर (मध्य प्रदेश) येथे प.पू. रामानंद महाराज (प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी) यांचा अनेकदा सत्संग मिळाला असून मला त्यांचे आशीर्वाद आणि स्नेहही मिळाला आहे. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात त्यांच्या छायाचित्रावर त्यांनी वर्ष २०१४ देहत्याग केल्याचे नमूद केले आहे. असे असूनही मला ‘त्यांनी काही दिवसांपूर्वीच देहत्याग केला आहे’, असे वाटत होते.

श्री. रवि गोयल

इ. आश्रमातील स्वागतकक्षात असलेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र जिवंत वाटत होते. ‘भगवान श्रीकृष्णाचे चित्र अतिशय आकर्षक वाटत होते आणि ते मला त्या चित्रामध्ये सामावून घेत आहे’, असे मला जाणवले.

ई. ‘आश्रमातील यज्ञ परिसर आणि श्री गणेशाची मूर्ती यांमधून पुष्कळ स्पंदने अन् प्रकाशही येत आहे’, असे मला वाटत होते.

उ. आश्रम पहातांना मला पुष्कळ चैतन्य मिळाले. ध्वनीचित्र चकती पहातांनाही मला पुष्कळ आध्यात्मिक लाभ झाला.

ऊ. मी काही वर्षांपूर्वी रामनाथी आश्रमात आलो होतो. तेव्हाही मला आश्रमात सात्त्विकता, तेज आणि आनंद जाणवला होता. या वेळी आल्यावर आश्रमातील सात्त्विकता, तेज आणि आनंद अधिकच वाढल्यासारखे जाणवत आहे.

ए. एका सत्संगाच्या वेळी दुपारी ३ ते रात्री ९ कधी वाजले, हे समजलेच नाही. सत्संगानंतर जेव्हा मी साधकांना किती वाजल्याचे सांगितले, तेव्हा सर्व साधक ‘‘संध्याकाळचे ६.३० वाजले असतील, तुम्ही आमची गंमत करत आहात’’, असे मला म्हणत होते.

ऐ. आश्रमाच्या लागवडीत श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी लावलेला एक कदंबाचा वृक्ष आहे. तो सरळ रेषेत वर गेला आहे. पू. तनुजादीदींच्या मार्गदर्शनाखाली मी जयपूर येथे आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन एक घर आणि भूमी घेतली आहे. त्या घराच्या मुख्य दाराजवळ मी एक कदंबाचा वृक्ष लावला आहे. तोही असाच सरळ रेषेत आहे. कदंब वृक्षाचे वैशिष्ट्य मला ठाऊक नसूनही मी तिथे हे झाड लावले.

ओ. मला पुष्कळ चहा पिण्याची सवय आहे. आश्रमात असतांना मी सकाळी न्याहारी केल्यानंतर केवळ एकदाच चहा घेतला; पण दिवसभर आणि सत्संगामध्ये माझे डोके जड झाले नाही. ‘मी चहा प्यायलो नाही’, याची जाणीवही मला झाली नाही. आश्रमात आल्यापासून मला प्रतिदिन ही अनुभूती आली आहे.

औ. मला आम्लपित्त आणि वात (एसिडिटी आणि गॅस) हे विकार आहेत. मी बाहेर गेल्यावर खाणे पालटल्यामुळे मला यासाठी औषध घ्यावेच लागते; पण आश्रमात मला कोणतीच अडचण आली नाही. आश्रमातील प्रसाद आणि महाप्रसाद यांतील दैवी गुण, परमेश्वराचे पुष्कळ आशीर्वाद आणि बनवणारे साधक यांचे तप, नामजप, शुद्ध भावना, शुद्ध विचार आणि प्रेम यांमुळे असे झाल्याचे जाणवले.

२. रामनाथी आश्रमात शिकायला मिळालेली सूत्रे

अ. आश्रमातील सर्व दैवी बालकांचे प्रत्येक शब्द आणि वाक्य चैतन्यमय होते. प्रत्येक शब्द अंतर्मनात जात होता. त्यांचे बोलणे पूर्णपणे आध्यात्मिक आणि दैवी होते. त्या सर्वांचे समर्पण आणि भक्ती अतुलनीय आहे.

आ. आश्रमात अनेक संत आणि सद्गुरु यांचे दर्शन झाले. त्यांची भेट झाली. ते सर्व अल्प शब्दांत आपले कुशलक्षेम, रहाण्याची व्यवस्था आणि काही अडचण असल्यास विचारणा करतात. ते सगळे कितीही व्यस्त असले, तरी पुष्कळ प्रेमाने भेटून बोलतात.

इ. ध्यानमंदिरात सकाळची आरती हिंदीमध्ये आणि संध्याकाळची आरती मराठीमध्ये केली जाते. सर्व साधकांचा विचार करून हे नियोजन केले आहे. दुसर्‍यांचा प्रेमपूर्वक विचार केल्यामुळेच हे शक्य होते.

ई. ओळखीचे साधक भेटल्यावर ते आपले आणि आपल्या कुटुंबाचे क्षेम अन् साधनेच्या संदर्भात विचारतात. त्यातून त्यांचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त होते.

उ. सर्व साधक भोजनानंतर स्वतःचे ताट, वाटी आणि पेला स्वतः धुतात अन् कोणत्याही भांड्यावर खरकटे किंवा अस्वच्छता नसते. यावरून सर्व साधकांचा ‘इतरांची काळजी घेणे’ हा गुण दिसून येतो.’

– श्री. रवि भूषण गोयल, देहली

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वैशिष्ट्य

परात्पर गुरु डॉ. आठवले

आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या सत्संगात अनंत चैतन्य, आशीर्वाद आणि स्नेह मिळाला. त्यांनी सांगितले, ‘‘स्वेच्छा नको, परेच्छा आणि ईश्वरेच्छेने रहावे.’’ त्यांनी संयमाने सर्वांचे म्हणणे ऐकले आणि सर्वांना मार्गदर्शनही केले. त्यांची प्रकृती बरी नाही. या सत्संगाच्या कालावधीत त्यांनी ६ – ७ वेळा औषध घेतले, तरीही ‘परात्पर गुरु डॉ. आठवले इतक्या उच्च पातळीचे संत असूनही ते सर्वांच्या कल्याणासाठी मार्गदर्शन करतात’, ही एक विलक्षण गोष्ट आहे.

– श्री. रवि भूषण गोयल, देहली

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक