अखेर अनिल देशमुख अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित !

अनिल देशमुख

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्याने अखेर अनिल देशमुख अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित झाले. गेल्या अनेक मासांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या; मात्र तरीही देशमुख अंमलबजावणी संचालनालयासमोर उपस्थित राहिले नव्हते.

अनिल देशमुख म्हणाले की, मला अंमलबजावणी संचालनालयाचे समन्स आले, तेव्हा ‘मी त्यांना सहकार्य करत नाही’, अशा चुकीच्या बातम्या माध्यमांमध्ये दिल्या. परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आणि ते स्वतःच गायब आहेत, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

१०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांवरून अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना वारंवार समन्स बजावले होते. तरीही ते चौकशीसाठी उपस्थित रहात नव्हते. त्यांची ५ कोटी रुपयांची संपत्ती कह्यात घेण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात वॉरंटही जारी करण्यात आले होते.