‘सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, शरदऋतू, आश्विन मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे. ५.११.२०२१ पासून कार्तिक मास आणि शुक्ल पक्ष चालू होणार आहे.
(साभार : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ३१.१०.२०२१ या दिवशी दुपारी १.१६ पर्यंत आणि १.११.२०२१ या दिवशी दुपारी १२.५३ पासून दुपारी १.२२ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ आ. भद्रा (विष्टी करण) : भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. ३१.१०.२०२१ या दिवशी दुपारी २.२८ पर्यंत आणि ३.११.२०२१ या दिवशी सकाळी ९.०३ पासून सायंकाळी ७.३६ पर्यंत विष्टी करण आहे.
२ इ. यमघंटयोग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंटयोग’ होतो. हा अनिष्टयोग आहे. प्रवासासाठी हा योग पूर्णतः वर्ज्य करावा. रविवार, ३१.१०.२०२१ या दिवशी सूर्याेदयापासून दुपारी १.१६ पर्यंत मघा नक्षत्र असल्याने यमघंटयोग आहे.
२ ई. रमा एकादशी : आश्विन मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला ‘रमा एकादशी’ हे नाव आहे. या एकादशीला श्रीविष्णूच्या केशव रूपाची पूजा करतात. या एकादशीच्या व्रतामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी टिकते. यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून दिवसभर श्री विष्णुचिंतनात रहावे. एकादशी तिथीला भगवान श्री विष्णुपूजनाचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ वाचावे. १.११.२०२१ या दिवशी रमा एकादशी आहे.
२ उ. वसुबारस : श्रीविष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे ‘वसुबारस.’ या दिवशी सायंकाळी सवत्स गायीचे पूजन करतात. १.११.२०२१ या दिवशी वसुबारस आहे.
२ ऊ. दग्धयोग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्धयोग होतो. दग्धयोग हा अशुभयोग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. १.११.२०२१ या दिवशी सोमवार असून दुपारी १.२२ पर्यंत एकादशी तिथी असल्याने ‘दग्धयोग’ आहे.
२ ए. गुरुद्वादशी : आश्विन मासातील कृष्ण पक्ष द्वादशी या दिवशी ‘गुरुद्वादशी’ हा सण साजरा करतात. या दिवशी शिष्य समर्पणभावाने गुरूंचे पूजन करतात. २.११.२०२१ या दिवशी गुरुद्वादशी आहे.
२ ऐ. धनत्रयोदशी : आश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशी या दिवशी ‘धनत्रयोदशी’ हा सण साजरा करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य असलेल्या ‘धन्वन्तरि देवते’ची जयंती. या दिवशी व्यापारी आपल्या तिजोरीचे आणि नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्यांचे पूजन करतात. या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. या दिवशी धन्वन्तरि देवतेला कडूनिंबाच्या पानांचा नैवेद्य दाखवतात. २.११.२०२१ या दिवशी धनत्रयोदशी आहे.
२ ओ. भौमप्रदोष : मंगळवारी येणार्या त्रयोदशी तिथीला ‘भौमप्रदोष’ म्हणतात. २.११.२०२१ या दिवशी भौमप्रदोष आहे. आर्थिक अडचणी नष्ट करण्यासाठी ‘भौमप्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.
२ औ. यमदीपदान : धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवतेला प्रार्थना करून ‘अकाली मृत्यू (अपमृत्यू) येऊ नये’, यासाठी सायंकाळी कणकेच्या तेलाचे १३ दिवे घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून लावतात. यालाच ‘यमदीपदान’ असे म्हणतात. २.११.२०२१ या दिवशी यमदीपदान करावे.
२ अं. क्षयदिन : ३.११.२०२१ या दिवशी ‘क्षयदिन’ आहे. क्षय तिथी शुभकार्यासाठी वर्ज्य असते.
२ क. शिवरात्री : प्रत्येक मासातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला ‘शिवरात्री’ व्रत करतात. निशीथकाली म्हणजे मध्यरात्री असलेल्या कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला शिवरात्री व्रत करावे. ३.११.२०२१ या दिवशी सकाळी ९.०३ पासून दुसर्या दिवशी सकाळी ६.०४ पर्यंत कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी आहे.
२ ख. नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान : आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला नरकचतुर्दशी म्हणतात. ४.११.२०२१ या दिवशी सकाळी ६.०४ पर्यंत कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. त्या वेळी नरकासुराने श्रीकृष्णाला ‘जी व्यक्ती या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करील, तिला नरकाची पीडा होऊ नये’, असा वर मागितला. त्यामुळे नरकचतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नानाचे विशेष महत्त्व आहे.
२ ग. यमतर्पण : ‘अपमृत्यू (अकाली मृत्यू) येऊ नये; म्हणून नरकचतुर्दशीला यमराजाच्या १४ नावांनी तर्पण करावे’, असे शास्त्र आहे. वडील जिवंत असलेल्यांनी पाण्यात तांदुळ घालून आणि इतरांनी पाण्यात तीळ घालून पुढील नावांनी यमतर्पण करावे.
या नावांनी तर्पण केल्यावर दक्षिणेकडे तोंड करून पुढील श्लोक १० वेळा म्हणून यमदेवतेला प्रार्थना करावी.
यमो निहन्ता पितृधर्मराजो वैवस्वतो दण्डधरश्च काल: ।
भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतान्त एतद्दशभिर्जपन्ति ।।
अर्थ : ‘यम, निहन्ता, पिता, धर्मराज, वैवस्वत म्हणजे सूर्यपुत्र, दण्डधर, काल, भूताधिप म्हणजे प्राणीमात्रांचे स्वामी, दत्तकृतानुसारी म्हणजे मृत्यूहरणाचे दिलेले कार्य करणारे आणि कृतान्त’, या १० नावांनी यमदेवाचा जप केला जातो.
२ घ. उल्कादर्शन : तूळ राशीत सूर्य असतांना आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी आणि अमावास्या या दोन दिवशी संध्याकाळी पुरुष हातात कोलीत (लहान जळके लाकूड) घेऊन पितरांना मार्ग दाखवतात. याला ‘उल्कादर्शन’, असे म्हणतात. ४.११.२०२१ या दिवशी सकाळी उल्कादर्शन आहे.
२ च. लक्ष्मी-कुबेर पूजन, अलक्ष्मी निःसारण : गुरुवार, ४.११.२०२१ या दिवशी सकाळी ६.०४ पासून उत्तररात्री २.४५ वाजेपर्यंत आश्विन अमावास्या तिथी आहेआश्विन अमावास्येला सायंकाळी प्रदोषकाळी घरोघरी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. हे पूजन करतांना चलनी नाणे, लक्ष्मीची प्रतिमा आणि कुबेर म्हणून सुपारी यांची मुख्यत्वे पूजा केली जाते. आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी आणि अमावास्या तिथी एकाच दिवशी असल्याने दीपावलीमध्ये होणारे नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मी-कुबेर पूजन, यमतर्पण, अलक्ष्मी निःसारण, उल्कादर्शन, दर्श अमावास्या, हे सर्व ४.११.२०२१ या दिवशी होणार आहे.
२ छ. दर्श अमावास्या : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) ‘दर्श’ संज्ञक मानतात. गुरुवार, ४.११.२०२१ या दिवशी सकाळी ६.०४ पासून उत्तररात्री २.४५ वाजेपर्यंत आश्विन अमावास्या तिथी आहे.
२ ज. महावीर निर्वाण दिन : भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थकर होते. दीपावली अमावास्येला ‘महावीर निर्वाण दिन’ साजरा करतात.
२ झ. दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, वहीपूजन, अन्नकूट, अभ्यंगस्नान, पतीस ओवाळणे, गोवर्धन पूजन : कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा ही उदयव्यापिनी असावी. ४.११.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.४५ पासून ५.११.२०२१ रात्री ११.१५ पर्यत कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आहे. या दिवशी व्यापारी दुकानाची आणि वहीची पूजा करतात. कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदेला ‘भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत’, यासाठी गोवर्धनपूजन आणि अन्नकूट केले जाते. या दिवशी पत्नी आपल्या पतीस ओवाळते. ५.११.२०२१ या दिवशी गुजराती संवत् २०७८ प्रमादी नाम संवत्सर आणि महावीर जैन संवत् २५४८ चालू होत आहे.
२ ट. यमद्वितीया (भाऊबीज), यमपूजन, अर्घ्यदान आणि तर्पण : अपराह्नकाळी असलेल्या द्वितीयेच्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या घरी भोजनास गेले होते; म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी बहिणीच्या हातचे भोजन करून तिचा सत्कार करावा. या दिवशीसुद्धा अपमृत्यू (अकाली मृत्यू) येऊ नये; म्हणून यमतर्पण करावे. ६.११.२०२१ या दिवशी भाऊबीज आहे.
२ ठ. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे ‘चंद्रकोर’रूपात प्रथम दर्शन होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ब्रह्मा आहे. ६.११.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.३० पर्यंत चंद्रदर्शन आहे.
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.
टीप २ – घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), यमघंट, दग्धयोग, एकादशी, प्रदोष, कुलधर्म, अन्वाधान, इष्टि आणि क्षयदिन यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित आणि हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.१०.२०२१) सौ. प्राजक्ता जोशी