बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर सतत आवाज उठवणे आवश्यक ! – तथागत रॉय, माजी राज्यपाल, त्रिपुरा आणि मेघालय

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

‘बांगलादेशी हिंदूंवर जिहादी आक्रमण !’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !

श्री. तथागत रॉय

रामनाथी (गोवा) – बांगलादेशात वर्ष १९४१ मध्ये २८ ते २९ टक्के हिंदू होते. सध्या तेथे केवळ ८ टक्के हिंदू उरले आहेत. बाकीचे हिंदू कुठे गेले ? वर्ष १९७१ नंतर बांगलादेशाची निर्मिती झाल्यावर हिंदूंना वाटले की, आपल्यावरील अत्याचार थांबतील; मात्र असे झाले नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या नवरात्रीत बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली; मात्र हे काही नवीन नाही. काहीतरी कारणे शोधून येथे हिंदूंवर आक्रमणे नेहमीच केली जातात. बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेसाठी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर सातत्याने आवाज उठवणे आवश्यक आहे. भारत सरकारनेही हिंदूंवरील आक्रमणे थांबवण्यासाठी बांगलादेशावर दबाव आणायला हवा, असे आवाहन त्रिपुरा आणि मेघालय राज्यांचे माजी राज्यपाल श्री. तथागत रॉय यांनी केले.

नुकत्याच झालेल्या नवरात्रीत कुराणाचा अवमान झाल्याचा तथाकथित दावा करून बांगलादेशातील धर्मांधांनी हिंदूंच्या हत्या केल्या, तसेच मंदिरांवर आक्रमणे केली. बांगलादेशात हिंदूंवर आजपर्यंत अनेक वेळा जिहादी आक्रमणे झाली आहेत आणि आताही चालू आहेत. बांगलादेशातील पीडित हिंदूंना तेथील सरकार आणि पोलीस यांच्याकडून साहाय्य मिळत नाही. धर्मांधांच्या धमक्यांमुळे अनेक हिंदू तेथून पलायन करत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बांगलादेशी हिंदूंवर जिहादी आक्रमण !’ या विषयावर १८ ऑक्टोबर या दिवशी ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष परिसंवादात त्रिपुरा आणि मेघालय राज्यांचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांच्यासह बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे पू.  (अधिवक्ता) रवींद्र घोष, ‘इशित्व फाउंडेशन’च्या संचालिका आरती अग्रवाल आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ३ सहस्र ६८३ जणांनी हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिला.

बांगलादेशातून हिंदूंनी पलायन करणे, हा हिंदूंचा नरसंहारच ! – आरती अग्रवाल, संचालिका, इशित्व फाउंडेशन

आरती अग्रवाल

‘इशित्व फाउंडेशन’च्या संचालिका आरती अग्रवाल म्हणाल्या की, बांगलादेशातून हिंदूंनी पलायन करणे, हा हिंदूंचा नरसंहारच आहे; कारण हिंदू स्वत:ची मालमत्ता सोडून जिवाच्या भीतीने बांगलादेशातून पलायन करत आहेत. बांगलादेशमधील हिंदूंवर गेल्या ९ वर्षांत ३ सहस्र ६७९ आक्रमणे झाली आहेत. यामध्ये अर्ध्याहून अधिक आक्रमणे येथील मंदिरांवर झाली आहेत. नुकत्याच झालेल्या नवरात्रीत हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. बांगलादेशातील एका मंदिरात १८ बाँब ठेवण्यात आले. हे सर्व अचानक कसे होऊ शकते ? यावरून हे हिंदूंच्या विरोधात षड्यंत्र असल्याचे लक्षात येते. ‘कुराणाचा अवमान केला’ हा हास्यास्पद आरोप असून त्याचा सर्वत्र प्रचार होतो; मात्र हिंदूंच्या हत्या आणि मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र यांविषयी शेख हसीना यांना कुणी प्रश्नही विचारत नाही. हिंदूंवरील अत्याचारांविषयी येथील सरकार काहीही उपाय न काढता शांत बसून हिंदूंवर आक्रमण करणार्‍यांना पाठिंबा देत आहेत.

जगाने बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांकडे लक्ष देणे आवश्यक ! – पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’

पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष

बांगलादेशमधील सरकार आणि विरोधी पक्ष यांनी येथील हिंदूंना सुरक्षित ठेवण्यासाठी कुठलीच पावले उचलली नाहीत. अल्पसंख्याक हिंदूंवर जिहाद्यांकडून आक्रमणे चालूच आहेत. जगाने बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बांग्लादेशमधील हिंदूंची शब्दांत वर्णन करता येणार नाही, अशी भयंकर स्थिती आहे.

भारत सरकारने बांगलादेशमध्ये प्रतिनिधी मंडळ पाठवावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

बांगलादेशमधील हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधात भारतातील बांगलादेश दुतावासांकडे हिंदूंनी तक्रारी करायला हव्यात. तसेच निषेध आंदोलने करून दबाव निर्माण करायला हवा. काश्मीरमध्ये मुसलमानांसाठी जाणारे ‘संयुक्त राष्ट्रा’चे प्रतिनिधी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराकडे ढुंकूनही पहात नाहीत. हिंदूंवरील अत्याचारांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी भारताने प्रतिनिधी मंडळ पाठवून त्याचा अहवाल घोषित केला पाहिजे. आसाममध्ये अवैध अतिक्रमण केलेल्या बांगलादेशी मुसलमानांना बाहेर हाकलावे.