ISI Bomb Attack Amritsar Temple : अमृतसर (पंजाब) येथे मंदिरावर फेकण्यात आले हातबाँब – स्फोटात जीवितहानी नाही

आक्रमणामागे आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) चा हात !

अमृतसर (पंजाब) – येथील ठाकुरद्वार मंदिरावर दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी २ हातबाँब फेकले. हे आक्रमण झाले, तेव्हा मंदिराचे पुजारी आत झोपले होते, सुदैवाने ते या आक्रमणातून थोडक्यात बचावले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या घटनेमागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.चा हात असल्याचे समोर आले आहे.

१. पंजाबचे पोलीस महानिरीक्षक गुरप्रीत सिंह भुल्लर म्हणाले की, सी.सी.टी.व्ही.मध्ये २ दुचाकीस्वार दिसत आहेत, ज्यांचा शोध घेतला जात आहे. ते लवकरच पकडले जातील.  पाकिस्तानी यंत्रणा प्रतिदिन गरीब कुटुंबातील तरुणांना अशा गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून हे स्पष्ट झाले आहे की, आय.एस्.आय. दुर्बल घटकांना लक्ष्य करत आहे. कुणाच्याही प्रभावाखाली किंवा पैशाच्या लोभापोटी अशा प्रकारची कृत्ये करू नका. याचा फटका त्यांना सहन करावा लागेल, असे आवाहनही पंजाबच्या पोलीस महानिरीक्षकांनी केले.

२. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, पंजाबमध्ये नेहमीच अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न होतात; परंतु पोलीस अशा समाजकंटकांवर त्वरित कारवाई देखील करतात. पंजाबमध्ये कोणत्याही परिस्थितीत शांतता, सौहार्द आणि बंधुता राखली जाईल.

स्फोटाच्या प्रकरणी ३ आरोपींना अटक

अमृतसरचे पोलीस महानिरीक्षक गुरप्रीत सिंह भुल्लर यांनी सांगितले की, बिहारमधील मधेपुरा येथून कर्ण, मुकेश आणि साजन या ३ जणांना आम्ही अटक केली आहे. ते नेपाळ येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना अटक करण्यात आली. हे लोक हातबाँब (ग्रेनेड) पुरवत होते. हे लोक ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणचे रहिवासी आहेत. आरोपींची चौकशी केली जाईल.

संपादकीय भूमिका

पंजाबमध्ये पाककडून खलिस्तानी समर्थकांना हाताशी धरून हिंसाचार करण्याचा होणारा प्रयत्न मोडून काढणे काळाची आवश्यकता आहे. यासाठी पंजाबमध्ये वेळीच राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अन्यथा बंगालप्रमाणे येथील स्थितीही हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, हेच खरे !