|
|
कॉमिला (बांगलादेश) – येथील ननुआ दिघी या भागामधील श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपामध्ये कुराणाचा अवमान केल्याच्या अफवेनंतर धर्मांधांनी श्री दुर्गादेवीच्या ९ पूजा मंडपांवर, तसेच १५० हिंदू कुटुंबे यांवर आक्रमणे केली. यामध्ये ३ हिंदू ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले. धर्मांधांनी मंडपांची नासधूस करत मूर्तींची तोडफोड केली.
१. या घटनेविषयी प्रख्यात बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी ट्वीट करून म्हटले की, काही हिंदुविरोधी कट्टरतावादी धर्मांधांनी गुपचूप कुराण आणून श्री दुर्गापूजा मंडपामधील श्री हनुमानाच्या मूर्तीच्या पायाजवळ ठेवले. हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी त्यांना निमित्त हवे होते. धार्मिक भावना दुखावल्याचे कारण त्यांना मिळाले. या घटनेनंतर बांगलादेश सरकार अल्पसंख्य समुदायाला वाचवेल, अशी आशा आहे. (अशा आशेवर जगणे हिंदूंनी सोडून द्यावे; कारण कोणत्याही इस्लामी देशांतील सरकार हिंदूंचे रक्षण कधीही करणार नाही. ‘आम्ही काही तरी करत आहोत’, असे एकवेळ दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल; मात्र रक्षण होणार नाही. तसेच असते, तर बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान येथील हिंदूंचा वंशसंहार थांबला असता आणि त्यांच्या लोकसंख्येत वाढ झाली असती ! – संपादक)
२. याविषयी ‘बांगलादेश हिंदु युनिटी कौन्सिल’ने म्हटले आहे की, येथील सर्व हिंदूंनी सतर्क रहाणे आवश्यक आहे. आम्ही हिंदूंचे संरक्षण होण्यासाठी पोलिसांच्या संपर्कात आहोत. (भारताचे असतो कि बांगलादेशातील, पोलीस हिंदूंचे रक्षण करतील, यावर विश्वास कधीच ठेवता येत नाही ! – संपादक)
३. यापूर्वी बांगलादेशची राजधानी ढाका येथील टिपू सुलतान मार्गावरील हिंदूंच्या मंदिरात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा करण्यास धर्मांधांनी विरोध केला होता. त्यामुळे हिंदूंना सरकारने दिलेल्या तात्पुरत्या जागेत श्री दुर्गादेवीची मूर्ती हालवून तेथे पूजा करावी लागली होती.
हिंदूंकडून कुराणाचा अवमान नाही !
कुराणाचा अवमान झाल्याची पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर धर्मांधांनी श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपांवर आक्रमण करण्यास प्रारंभ केला. ‘कॉमिला महानगर पूजा उद्जापोन कमेटी’चे सरचिटणीस शिबू प्रसाद दत्ता यांनी कुराणाचा अवमान झाल्याची घटना फेटाळून लावली. ते म्हणाले, ‘सुरक्षारक्षक झोपला असतांना कुणीतरी मंडपामध्ये कुराणाची प्रत आणून ठेवली.’
याविषयी एका सरकारी अधिकार्याने सांगितले की, काही समाजकंटकांनी या ठिकाणी ठेवलेल्या कुराणाच्या प्रतीचे छायाचित्र काढले आणि फेसबूकवरून ते प्रसारित केले. त्यानंतर आक्रमणे चालू झाली. यामागे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बी.एन्.पी.) आणि जमात-ए-इस्लाम या संघटनांचे काही कार्यकर्ते सहभागी असल्याचा संशय आहे.
३ हिंदूंची हत्या !
फेसबूकवर पोस्ट प्रसारित झाल्यावर बांगलादेशातील हाजीगंज, बंशखली, शिबगंज आणि पेकुआ येथील मंदिरांवर आक्रमणे करून तेथे उपस्थित हिंदूंना मारहाण करण्यात आली. यांत ३ हिंदूंची हत्या झाली.
१५० हून अधिक हिंदु कुटुंबांवर आक्रमणे !
या आक्रमणांविषयी नंतर सामाजिक माध्यमांतून हिंदूंनी व्हिडिअो आणि छायाचित्रे प्रसारित केली. येथील अधिवक्ता डॉ. गोबिंद चंद्र प्रामाणिक यांनी ट्वीट करून म्हटले की, येथील स्थिती अत्यंत भयावह आहे. शिल्पारा, कॉक्स बाजारमध्ये १५० हिंदु कुटुंबांवर आक्रमणे करण्यात आली. नोआखलीच्या हटियामध्ये तोडफोड, तर काली मंदिरामध्ये मूर्तींची तोडफोड, महिलांची छेडछाड, तसेच हिंदूंना मारहाण करण्यात आली.
कॉमिला येथे ९ मंडपांवर आक्रमणे
वृत्तसंकेतस्थळ ‘हिंदु व्हॉईस’ने धर्मांधांनी श्री दुर्गादेवीची मूर्ती नदीत फेकण्याचा व्हिडिओ पोस्ट करून कॉमिला येथे ९ मंडपांवर आक्रमण करून तेथील मूर्तींची तोडफोड केल्याची माहिती दिली. येथे आक्रमणे अद्यापही चालू आहेत. त्यामुळे तणावाची स्थिती आहे. हिंदू घाबरलेले आहेत. ‘पोलीस धर्मांधांना रोखण्यात अपयशी ठरले आहेत’, असेही या संकेतस्थळाने म्हटले आहे.
१३ ऑक्टोबरचा दिवस हिंदूंसाठी काळा दिवस ! – बांगलादेश हिंदू एकता परिषद
बांगलादेश हिंदू एकता परिषदेने या आक्रमणांविषयी म्हटले की, १३ ऑक्टोबरचा दिवस बांगलादेशच्या इतिहासासाठी काळा आणि निंदनीय दिवस आहे. याविषयी संपूर्ण जग शांत आहे. बांगलादेशमधील हिंदूंविषयी इतका द्वेष का ? वर्ष १९७१ च्या नरसंहाराच्या वेळी मरणारे हिंदूच अधिक होते. बांगलादेशातील हिंदू हे मुसलमानांना भाऊ मानतात. आम्ही बांगलादेशातील काही लोकांचा खरा तोंडवळा पाहिला आहे. आम्हाला आता ठाऊक नाही की, भविष्यात काय होणार आहे; मात्र हिंदू वर्ष २०२१ ची श्री दुर्गादेवीची पूजा कधीच विसरणार नाहीत.
सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ हटवण्यासाठी फेसबूकला विनंती ! – दूरसंचार मंत्री मुस्तफा जब्बार
बांगलादेशचे दूरसंचार मंत्री मुस्तफा जब्बार यांनी म्हटले की, सामाजिक माध्यमांतून कुराणाचा अवमान करणारे, तसेच आक्रमणाच्या संदर्भातील सर्व व्हिडिओ आणि छायाचित्रे हटवण्यासाठी फेसबूकशी संपर्क करण्यात आला आहे. ते लवकरच हटवले जातील, अशी आशा आहे.
(म्हणे) ‘दोषींना शोधून कठोर शिक्षा करणार !’ – बांगलादेश सरकार
सत्ताधारी ‘अवामी लीग’चे सरचिटणीस ओबैदुल कादर यांनी आश्वासन दिले की, या घटनेत जे कुणी दोषी आहेत किंवा कोणत्या पक्षाशी ते संबंधित असले, तरी त्यांना सोडले जाणार नाही. या हिंसाचाराच्या घटनेनंतर संपूर्ण बांगलादेशात सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी दोषींना शोधून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचा आदेश दिला आहे. (आतापर्यंत हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे झाली. ती करणार्या किती जणांना शिक्षा झाली ? – संपादक)