वाचा नवीन सदर
‘व्याकरण ही हिंदु धर्मातील १४ विद्यांपैकी दहावी विद्या आहे. ‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांचा काळ लोटल्यावर संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी अनेक भाषांची निर्मिती झाली. कालांतराने या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेतील काही विद्वानांनी तर मराठीवरील संस्कृत व्याकरणाचे वर्चस्व झुगारण्याची बंडखोरी करण्यासही प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
आजच्या लेखात आपण ‘शब्दांची अंत्य (शेवटची) अक्षरे व्याकरणदृष्ट्या कशी लिहावीत ?’, हे जाणून घेऊ.
शब्दांच्या अंत्य (शेवटच्या) अक्षरांच्या व्याकरणासंबंधीचे नियम
१. एकाक्षरी शब्द लिहिण्याची पद्धत
अ. ‘जे शब्द एकाक्षरी असतात, म्हणजे एकाच अक्षराने सिद्ध होतात, त्या शब्दांतील ई-कार किंवा ऊ-कार दीर्घ उच्चारला जातो. त्यामुळे तो दीर्घ लिहावा, उदा. ती, तू, ही, जी, धू, पी, मी इत्यादी.
आ. वाक्यात ‘किंवा’ या अर्थाने लिहावयाचा ‘कि’ र्हस्व लिहावा, उदा. ‘कार्यक्रम पुण्याला घ्यावा कि मुंबईला ?’, हे अद्याप ठरलेले नाही.
२. कोणत्याही शब्दाच्या अंती (शेवटी) येणारा ई-कार किंवा ऊ-कार दीर्घ लिहावा, उदा. पोळी, नदी, प्रीती, कुंकू, वासरू, ऋतू इत्यादी.
३. पुनरुक्त शब्द त्यांतील पहिल्या पदानुसार (शब्दानुसार) आणि नादानुकारी शब्द उच्चारांनुसार लिहावेत !
खरीखरी, हळूहळू हे शब्द ‘खरी’, ‘हळू’ या शब्दांचा दोन वेळा उच्चार करून सिद्ध झाले आहेत. अशा शब्दांना ‘पुनरुक्त शब्द’ असे म्हणतात. या शब्दांतील दुसरे आणि चौथे अक्षर पहिल्या मूळ पदामध्ये (शब्दामध्ये) दीर्घ असल्याने दीर्घ लिहावे; परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी (उच्चारांतून नाद निर्माण करून त्याद्वारे विचार स्पष्ट करणारे) असतील, तर ते उच्चारांप्रमाणे र्हस्व लिहावेत, उदा. दुडुदुडु, रुणुझुणु, लुटुलुटु इत्यादी.
४. काही तत्सम आणि दाक्षिणात्य शब्दांचे पूर्ण उच्चारले न जाणारे शेवटचे अक्षर हलंत (पाय मोडून) लिहावे !
काही तत्सम शब्दांचे (संस्कृतमधून जशाच्या तशा आलेल्या शब्दांचे) उच्चार करतांना त्यांची शेवटची अक्षरे पूर्ण उच्चारली जात नाहीत. त्यामुळे ती हलंत (पाय मोडून) लिहावीत, उदा. अर्थात्, क्वचित्, साक्षात्, कदाचित्, अन्, अवाक् इत्यादी. काही दाक्षिणात्य नावांमध्येही अंत्य अक्षरे अपूर्ण उच्चारली जातात. तीदेखील हलंत लिहावीत, उदा. राघवन्, सुब्रह्मण्यम्.
५. तत्सम अव्यये, त्याचबरोबर मराठी अव्ययांतील ‘नि’, तसेच ‘आणि’मधील ‘णि’ र्हस्व लिहावेत !
प्रचलित मराठीप्रमाणे परंतु, तथापि, कदापि, यथामति, इति या सर्व तत्सम अव्ययांचे अंत्य अक्षर त्यांच्या उच्चारांनुसार र्हस्व लिहावे. त्याचबरोबर मराठी भाषेतील ‘नि’ हे अव्यय र्हस्व, तसेच ‘आणि’ हे अव्यय र्हस्वांत लिहावे. वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचे लिंग, वचन अन् पुरुष (उदा. प्रथम पुरुषी) पालटले, तरी ज्यांची रूपे जशीच्या तशी रहातात, त्यांना ‘अव्यये’ असे म्हणतात.
६. मराठीची जननी संस्कृत भाषा ही सर्वाधिक सात्त्विक असून ‘मराठी भाषिकांना तिचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा’, यासाठी मराठीतील अध्यात्माशी संबंधित काही शब्द संस्कृतप्रमाणे लिहिणे योग्य असणे
मराठीत शब्दांच्या शेवटी येणारा ई-कार आणि ऊ-कार दीर्घ लिहिण्यात येतो; परंतु पुढील गटांतील शब्द हे मूळ संस्कृत भाषेनुसार लिहावेत, म्हणजे या शब्दांची अंत्य अक्षरे संस्कृतमध्ये र्हस्व असल्यास मराठीतही र्हस्व लिहावीत आणि संस्कृतमध्ये दीर्घ असल्यास मराठीतही दीर्घच लिहावीत. त्याचबरोबर संस्कृतमध्ये लेखनाची आणखी काही निराळी पद्धत असेल, उदा. शब्द हलंत (पाय मोडून) लिहिणे, तर मराठीतही तीच पद्धत वापरावी. याचे कारण असे की, ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची शक्ती हे एकत्र असतात’, हा अध्यात्मशास्त्रातील सिद्धांत आहे. त्यामुळे जेव्हा आपण ‘गणपति’ हा शब्द लिहितो, तेव्हा श्री गणपतीचे तत्त्व सूक्ष्म रूपात त्या ठिकाणी अवतरित होते. या शब्दाचे व्याकरण गणेशतत्त्वाच्या जेवढ्या अधिक जवळ जाणारे असेल, तेवढा त्या तत्त्वाचा अधिक आध्यात्मिक लाभ आपल्याला होऊ शकतो. देवभाषा संस्कृतचे व्याकरण हे सर्वाधिक सात्त्विक आणि देवतातत्त्वांच्या अधिकाधिक जवळ जाणारे आहे. सनातन संस्थेने वेळोवेळी केलेल्या संशोधनांमधून ‘संस्कृत भाषेची सात्त्विकता अन्य भाषांच्या तुलनेत किती अधिक आहे ?’, हे पुढेही आले आहे. त्यामुळे ‘अशा शब्दांचे लिखाण संस्कृत भाषेनुसार केल्यास मराठी भाषेतील चैतन्य आणखी वाढेल आणि त्याचा मराठी भाषिकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होईल’, ही गोष्ट लक्षात घेऊन पुढील गटांतील शब्दांचे लेखन संस्कृत भाषेच्या व्याकरणानुसार करणे योग्य आहे.
६ अ. देवतांची नावे
६ अ १. देवतांची नावे ‘देवता’ म्हणून लिहितांना किंवा व्यवहारात व्यक्तीचे अथवा अन्य कशाचे तरी नाव म्हणून लिहितांना संस्कृतप्रमाणे लिहावीत ! : सर्व देवतांची नावे संस्कृत व्याकरणाप्रमाणे लिहावीत, उदा. श्रीविष्णु, मारुति, श्रीहरि आदी नावे र्हस्वांत, तर सरस्वती, पार्वती आदी नावे दीर्घांत लिहावीत. केवळ ‘देवता’ म्हणून उल्लेख करतांनाच नव्हे, तर एरव्हीही व्यक्ती, वास्तू आदींना देवतांची नावे दिली असल्यास तीसुद्धा संस्कृतनुसारच लिहावीत. याचे कारण असे की, ‘जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मुलाचे नाव देवतेच्या नावावरून ठेवते, तेव्हा ‘त्या देवतेचे गुण आपल्या मुलामध्ये यावेत, तसेच तिचे आशीर्वाद त्याला मिळावेत’, अशी तिची इच्छा असते. वास्तू आदींच्या संदर्भातही असेच आहे. बहुतेक वेळा ‘संबंधित देवतेचा निवास वास्तूत असावा’, यासाठी वास्तूला तिचे नाव दिले जाते. हे लक्षात घेता ही सर्व नावे संस्कृत व्याकरणानुसार लिहिणे त्या त्या व्यक्तीच्या उद्देशांस पूरक ठरते.
६ अ २. शक्ति : हा शब्द ‘देवतातत्त्व’ या अर्थाने लिहावयाचा असल्यास ‘शक्ति’ असा र्हस्वांत लिहावा, उदा. आदिशक्ति. याउलट ‘मनुष्याची शक्ती’, ‘वाफेची शक्ती’ यांसारख्या व्यावहारिक उल्लेखांच्या वेळी तो दीर्घांत लिहावा.
६ आ. पंचतत्त्वे – ‘पंचतत्त्वे’ या अर्थाने लिहितांना संबंधित शब्द संस्कृतच्या व्याकरणाप्रमाणे, तर व्यावहारिक अर्थाने लिहितांना तेच शब्द मराठीच्या व्याकरणाप्रमाणे लिहावेत ! : पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे आहेत. ती देवतास्वरूप असल्यामुळे त्यांच्या नावांनाही संस्कृत व्याकरणाचे नियम लावावेत, उदा. अग्नि (तेजतत्त्व), वायु या शब्दांतील ‘ग्नि’ आणि ‘यु’ हे र्हस्व लिहावेत; मात्र केवळ ‘तत्त्व’ या अर्थाने लिहितांनाच हा नियम लावावा. अन्य व्यावहारिक संदर्भात हे शब्द मराठीच्या व्याकरणानुसार ‘अंत्य अक्षर दीर्घ’ या पद्धतीने लिहावेत, उदा. स्वयंपाकाचा अग्नी, नळकांड्यामध्ये भरलेला वायू इत्यादी.
६ इ. ग्रह : हिंदु संस्कृतीनुसार ग्रह हे देवतास्वरूप आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीचा मनुष्याच्या जीवनावर फार मोठा परिणाम होतो. पूजाविधींमध्येही आरंभी नवग्रहांची शांती केली जाते. या कारणांमुळे सर्व ग्रहांची नावे संस्कृत व्याकरणानुसार लिहावीत, उदा. शनि, राहु, केतु इत्यादी.
६ ई. धर्मग्रंथ : चार वेद हे अपौरुषेय आहेत. ते ईश्वरनिर्मित आहेत. पुढील काळात निर्माण झालेले स्मृतिग्रंथ, उपनिषदे आदी सर्वांचा पाया वेदच आहेत. याचबरोबर द्रष्ट्या ऋषिमुनींनी निर्माण केलेले अन्य धर्मग्रंथ हेही ईश्वरप्राप्तीचा मार्ग सांगणारे मार्गदर्शक ग्रंथ आहेत. यामुळे या सर्व ग्रंथांची नावे संस्कृतनुसार लिहावीत, उदा. मनुस्मृति, कठोपनिषद् इत्यादी.
६ उ. ऋषी
६ उ १. ‘ऋषि’ हा शब्द एकवचनी असल्यास र्हस्वांत आणि बहुवचनी असल्यास दीर्घांत लिहावा ! : सहस्रो वर्षे तप करणारे ऋषी, मुनी आदी सर्व देवतास्वरूप असल्यामुळे लिखित भाषेत त्यांचा उल्लेख संस्कृत व्याकरणानुसार करावा. ‘एक ऋषि’ असे लिहावयाचे असल्यास ‘षि’ र्हस्व लिहावा आणि ‘अनेक ऋषी’ असे लिहावयाचे असल्यास ‘षी’ दीर्घ लिहावा. ‘मुनि’ या शब्दालाही हाच नियम लावावा. संस्कृत व्याकरणामध्ये ‘ऋषि’ किंवा ‘मुनि’ हे शब्द एकवचनी असतील, तर ते र्हस्वांत असतात; द्विवचनी असतील, म्हणजे ‘दोन ऋषी’ किंवा ‘दोन मुनी’, असा उल्लेख असेल, तर ते दीर्घांत असतात आणि अनेकवचनी असतील, तर या शब्दांचे रूप पालटून ते अनुक्रमे ‘ऋषयः’ आणि ‘मुनयः’, असे होते. मराठीत द्विवचन नाही आणि संस्कृतमधील अनेकवचनाचे रूप आपण मराठीत वापरू शकत नाही. त्यामुळे आपण संस्कृतमधील द्विवचनाचा नियम वापरून मराठीत अनेकवचनी ‘ऋषी’ आणि ‘मुनी’ हे शब्द दीर्घांत लिहितो.
६ उ २. महर्षि, देवर्षि इत्यादी शब्द ‘ऋषी’ या वर्गातीलच असल्यामुळे त्यांचे र्हस्व-दीर्घ संस्कृतप्रमाणेच लिहावे.
६ उ ३. ऋषींची नावे त्यांच्या मूळ नावांप्रमाणे लिहावीत, उदा. वाल्मीकि, अत्रि, मरीचि, क्रतु इत्यादी.
६ उ ४. ऋषींच्या नावांच्या अखेरीस ‘ऋषि’ शब्द जोडावयाचा असल्यास ‘षि’ र्हस्व लिहावा, उदा. वसिष्ठऋषि, गौतमऋषि, भरद्वाजऋषि इत्यादी.
६ उ ५. ‘सप्तर्षी’ या शब्दात सात ऋषींचा अंतर्भाव असल्यामुळे तो मराठी व्याकरणानुसार दीर्घांत लिहावा ! : सप्तर्षी म्हणजे ‘सात ऋषींचा समूह.’ संस्कृतमध्ये या समुहाला ‘एक समूह’ या अर्थाने एकवचनी मानले जाते; म्हणून ‘सप्तर्षि’ असे र्हस्वांत लिहितात. मराठीत मात्र या शब्दात सात ऋषींचा अंतर्भाव असल्यामुळे हा शब्द अनेकवचनी मानावा आणि अनेकवचनी झाल्यामुळे त्यातील ‘र्षी’ दीर्घ लिहावा. संस्कृतमधील पंचतत्त्व, पंचमहाभूत हे शब्ददेखील त्या भाषेत ‘एक समूह’ या अर्थी एकवचनी असले, तरी मराठीमध्ये येतांना ते पंचतत्त्वे, पंचमहाभूते असे अनेकवचनी येतात.’
– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.८.२०२१)