सनातन संस्था शिकवत असलेल्या साधनेने केवळ कुटुंबच नव्हे, तर पिढ्या साधनारत होणे‘सर्व आध्यात्मिक संस्था केवळ या पिढीतील व्यक्तींना साधना शिकवतात, तर सनातन संस्था सर्व वयोगटांच्या जिज्ञासूंना साधना नुसती शिकवत नाही, तर त्यांच्याकडून करवून घेते. याचा परिणाम म्हणून अनेक सात्त्विक जीव साधना करणार्या पालकांच्या पोटी जन्माला येत आहेत. यापैकी अनेक बालसाधक लहानपणीच ६० टक्क्यांहून अधिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत. त्यामुळे आता दुसरी पिढीही साधना करू लागली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. साधनेला आरंभ
१ अ. पत्नीने सत्संगात परात्पर गुरुदेवांना ‘माझे पती नामस्मरण करत नाहीत’, असे सांगणे, त्यावर परात्पर गुरुदेवांनी ‘त्यांना प.पू. गोंदवलेकर महाराजांचा ग्रंथ वाचायला सांगा’, असे सांगणे आणि त्यानुसार ग्रंथ वाचल्यावर माझे नामस्मरण चालू होणे : ‘मी नोकरीनिमित्त सांगली येथे रहात होतो. फेब्रुवारी १९९७ मध्ये आमच्या घरासमोर सनातनचा सत्संग चालू झाला. माझी पत्नी सौ. संगीता (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) या सत्संगात जाऊ लागली. त्या वेळी पत्नीला देवाधर्माची विशेष ओढ नसतांनाही ‘ती सत्संगात जात आहे’, हे ऐकून मला बरे वाटले. त्यानंतर एप्रिल १९९७ मध्ये एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले सांगली येथे आले होते; परंतु त्याच दिवशी कार्यालयीन कामासाठी मला सातारा येथे जावे लागले. प.पू. गुरुदेवांनी सांगली येथे घेतलेल्या सत्संगात माझ्या पत्नीने परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘माझे पती सज्जन आहेत; परंतु मी सांगूनही ते नामस्मरण करत नाहीत.’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या पत्नीला सांगितले, ‘‘यजमानांना प.पू. गोंदवलेकर महाराजांचा ग्रंथ वाचायला सांगा.’’ त्यानुसार मी प.पू. गोंदवलेकर महाराजांचा ‘सहज बोलणे हितोपदेश’ हा ग्रंथ वाचला आणि मला ‘नाम घ्यावे’, असे वाटू लागले. तेव्हापासून माझे नामस्मरण चालू झाले. परात्पर गुरुदेवांच्या सर्वज्ञतेची ही मला पहिली अनुभूती होती.
२. सत्सेवेला आरंभ
२ अ. परात्पर गुरुदेवांची जाहीर सभा, गुरुपौर्णिमा इत्यादी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने सेवेतील आनंद मिळणे आणि त्यानंतर सेवेला आरंभ होणे : सांगली येथे परात्पर गुरुदेवांची झालेली जाहीर सभा, गुरुपौर्णिमा इत्यादी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर मला सेवेतील आनंद मिळू लागला. त्यानंतर आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत आणि आधुनिक वैद्या (डॉ.)(सौ.) नंदिनी सामंत यांनी आम्हा उभयतांकडून ‘प्रवचन घेणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, सत्संग घेणे इत्यादी सेवांचे नियोजन कशा पद्धतीने करायचे ?’, याची सिद्धता करवून घेतली. ‘आमचे एका वर्षाने सांगली येथून स्थानांतर (बदली) होणार’, हे गुरुदेवांनी द्रष्टेपणाने जाणल्यामुळेच त्यांनी माझी द्रुतगतीने सिद्धता करवून घेतली. मी प्रत्येक रविवारी सांगली जिल्ह्यातील जत येथे सत्संग घेण्यासाठी जात होतो. त्यानंतर डिसेंबर १९९७ पासून मी सोलापूर येथे अभ्यासवर्ग घेण्यास आरंभ केला.
(क्रमश:)
– श्री. प्रमोद घोळे, बिबवेवाडी, पुणे. (२९.५.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |