ज्ञानसूर्य तळपू दे !

संपादकीय

बनारस हिंदु विश्वविद्यालयात हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आधारित अभ्यासक्रमाला प्रारंभ होणार

बनारस हिंदु विश्वविद्यालयात हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आधारित अभ्यासक्रमाला प्रारंभ होणार आहे. अन्य विषयांप्रमाणे ‘हिंदु धर्म आणि संस्कृती’ या विषयात आता पदवीधर होता येणार आहे. वेदादी धर्मग्रंथांतील, तसेच रामायण आणि महाभारत यांतून उलगडणारे हिंदु धर्माचे ज्ञान हे यात शिकवले जाईल. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे या ज्ञानाचा व्यावहारिक आणि प्रायोगिक उपयोग शिकवला जाईल. त्यामुळे या ‘सनातन धर्मातील ज्ञानाचा उपजीविकेसाठी काय उपयोग ?’ असा प्रश्न पालक किंवा विद्यार्थी यांना पडणार नाही.

ज्ञानाची तेजस्वी परंपरा !

सध्या ज्या देशांनी वैज्ञानिक प्रगती केलेली दिसत आहे, त्यांचे अस्तित्वही या जगाच्या पाठीवर नसतांना एकेकाळी भारताचा संपूर्ण विश्वात मोठा व्यापार चालू होता. उत्तमोत्तम  लाकूड, लोखंड, सोने, विविध प्रकारचे धातू भारतात होते अन् त्यांच्या साहाय्याने कला आणि संस्कृती विकसित झाली होती. कापड आणि खाद्यपदार्थ आदींचा मोठा व्यापार होता. नऊ मजल्याच्या नालंदा विद्यापिठात २०० शिक्षक आणि १२ सहस्र विद्यार्थी होते. जगाला व्याकरण आणि अर्थशास्त्र यांची देणगी देणारे पाणिनी आणि आर्य चाणक्य असे दिग्गज आचार्य ६४ विषय शिकवल्या जाणार्‍या तक्षशिला विद्यापिठामध्ये शिकवत होते. अशी अन्यही विद्यापिठे भारतात होती, ज्यांत सहस्रोंच्या संख्येने विद्यार्थी काही वर्षे वास्तव्य करत. त्यांचा निवास, भोजन आदी सारा खर्च विद्यापीठ करत असे आणि विशेष म्हणजे त्यांना कोणतेही शुल्क नसे. चीन, जपान आदी देशांतील प्रवाशांनी केलेली येथील गुरुकुलाची वर्णने आणि त्यांनी येथून ग्रंथरूपात नेलेले ज्ञान याविषयीची माहिती उपलब्ध आहे. प्राचीन काळात जहाजबांधणी, स्थापत्यशास्त्र, विविध प्रकारच्या उपचारपद्धती आणि अलीकडच्या काळात विमान, वीज आदी सारे बनवण्याची मूळ प्रक्रिया भारतातून विदेशात गेली, असे पुरावे सापडतात. एक उदाहरणच द्यायचे झाले, तर नागार्जुनाचार्य यांच्या ‘रसरत्नाकरम्’ ग्रंथाची केवळ काही पाने शिल्लक आहेत आणि जो आजच्या ‘केमिस्ट्री’चा (रसायनशास्त्राचा) पाया आहे. ते ज्ञान भारतातून अरब मुसलमान घेऊन गेले अन् त्यांच्याकडून ते युरोपियन लोकांनी घेतले. हिंदु संस्कृतीच्या द्वेषापोटी केवळ मुसलमानांनीच ही प्राचीन विद्यापिठे जाळली असे नव्हे, तर ‘धर्मशिक्षण हीच तेजस्वी आणि प्रगत विजयी हिंदूंची ऊर्जा आहे’, हे ओळखून ख्रिस्ती इंग्रजांनी वर्ष १८०० पर्यंत मोठ्या प्रमाणात चालू असलेली येथील गुरुकुलपद्धत उद्ध्वस्त केली. इंग्रजांनी त्यांच्या सरकारला आवश्यक असणारे कारकून सिद्ध करण्यासाठी सर्वांना एकसारखे शिक्षण देणारे पाठ्यक्रम सिद्ध करून देशातील ज्ञानच जणू लुप्त केले. मॅक्समुलर आणि तत्सम पाश्चात्त्य तथाकथित विद्वानांनी वेद, उपनिषदे आणि धर्मग्रंथ यांचे चुकीचे अर्थ लावून पुढे आणले. व्यापक आणि अनेकार्थी शब्दवैभव असलेल्या संस्कृतचा त्यांना पुरेसा अभ्यासही नव्हता. हिंदूंच्या धर्मअस्मितेचे हनन करून तेजोभंग करण्याचा त्यांचा कुटील हेतू बर्‍याच अंशी साध्य झाला. स्वातंत्र्यानंतर बुद्धीवादी आणि साम्यवादी यांच्या हातात हे आयते कोलीत मिळाले. त्यातूनच पुढे ‘हिंदू गोमांस खात होते’ किंवा ‘प्राचीन भारतात मुक्त लैंगिक संबंध होते’ अशा प्रकारचे चुकीचे निष्कर्ष पुढे आणले गेले.

पुरो(अधो)गाम्यांना चपराक !

बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या पाठ्यक्रमाच्या निमित्ताने हिंदु धर्मातील विविध गोष्टींविषयीचा डोळस अभ्यास होऊन त्यांतील वाद संपुष्टात येऊ शकतील. हिंदु धर्म हा अतीप्राचीन असल्यामुळे गेल्या ३ युगांत अनेक धर्मग्रंथांची निर्मिती होणे अपरिहार्य होते. काळानुसार ज्ञान सुलभ भाषेत आणि व्यक्तीला पातळीप्रमाणे ते आकलन होण्यासाठी अनेक संतमहात्म्यांनी हे ग्रंथ लिहिले. त्या सर्वांमध्ये अध्यात्म आणि धर्म सांगितलेला आहे; परंतु ज्ञान अनंत असल्याने सामान्य माणसाचा ‘काय करावे आणि काय करू नये’, याचा गोंधळ होतो किंवा सांप्रदायिक वादही निर्माण होतात. या पाठ्यक्रमामुळे नेमके शास्त्रार्थ योग्य अंगांनी पुढे येतील आणि अंतिमतः धर्माचा अभ्यास वाढण्यात त्याची परिणती होईल. आज बुद्धीवादी हिंदूंना ‘कोणत्या धर्मग्रंथात हे सूत्र लिहिले आहे’, असे विचारून आव्हान देतात. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना मिळून विविध धर्मग्रंथांतील शास्त्रसंदर्भ पुढे येऊन ते अभ्यासकांना ज्ञात होतील. ‘सण आणि व्रते आज मौजमजा करण्यासाठी आहेत’, अशी धारणा झाली आहे. काही हिंदूही त्याला पर्यावरणाचे संदर्भ जोडून त्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात. ती त्याची मर्यादा आहे; परंतु सण, व्रते, धार्मिक विधी, हिंदूंचे आहार, विहार आणि आचार या प्रत्येकामागे किती सखोल धर्मशास्त्र अन् अखिल मानवजातीचे कल्याण आहे, हे धर्मग्रंथांचा मुळातून अभ्यास केल्याशिवाय कळत नाही. हे सर्व होण्यास या पाठ्यक्रमामुळे चालना मिळेल. स्वातंत्र्यानंतर हिंदूंचे धर्मग्रंथ आणि यांची जी अतोनात आन् कधीही भरून न येणारी हानी तत्कालीन काँग्रेस सरकारने केली, ती भरून निघण्याचे दिवस आता जवळ आले आहेत. हा पाठ्यक्रम त्याची नांदी ठरेल, अशी अपेक्षा करूया. अमेरिकेत ४४, जपानमध्ये १७, तर इटलीत १३ ठिकाणी संस्कृत भाषा पाठ्यक्रमात शिकवली जाते. नेहरूंनी ‘मृत’ ठरवलेली संस्कृत भाषा पाश्चात्त्यांनी ‘जागृत’ असल्याचे सिद्ध केले आहे. नासामध्ये वेदांतील ज्ञानाचा उपयोग होत असल्याचे म्हटले जाते. वेदांचे शास्त्रार्थ जाणून घेण्यासाठी खरेतर साधनेचा पाया असावा लागतो. ‘साधनारत सत्त्वगुणी व्यक्ती ज्ञानाचा योग्य विनियोग करू शकते’, हेही याच अभ्यासातून लक्षात येईल. हिंदूंच्या विविध संस्कृत ग्रंथांत व्यावहारिक ज्ञान, अध्यात्माचे ज्ञान, धर्मशास्त्र असे सर्व काही आहे. आपत्काळात अनेक गोष्टींचा विध्वंस झाल्यावर पुढे अनेक गोष्टींची नवनिर्मिती करावी लागेल. त्यात औषधे बनवण्यापासून ते पुल बांधणी करण्यापर्यंत अनेक गोष्टी येतील. या पाठ्यक्रमातून ते शिकवल्यास भावी पिढीला त्याचा खर्‍या अर्थाने लाभ होईल !