‘भगवंत आहे’, हा भाव हवा !

श्री विठ्ठल

पतीची शेवटची इच्छा म्हणून पत्नीने पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या चरणी विमा रकमेतील १ कोटी रुपये अर्पण केले आणि पतीला दिलेला शब्द पूर्ण केला, तसेच पत्नी स्वतः सामान्य कुटुंबातील असल्याने तीने स्वतःचे नाव घोषित करण्यास नकार दिला. पतीची शेवटची इच्छा म्हणून मनात कोणताही किंतु न आणता एवढी मोठी रक्कम अर्पण करणे, हे कौतुकास्पदच आहे ! कलियुगामध्ये सामान्य कुटुंबातील व्यक्तीने अशी असामान्य कृती करणे, यातून पती-पत्नीची भगवंताप्रती असलेली अतूट श्रद्धा आणि भक्ती लक्षात येते. ही कृती सर्वांना प्रेरणा देणारी आहे. धर्मद्रोही, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी धर्माच्या विरुद्ध कितीही रान उठवले, तरी समाजातील लोकांमध्ये भगवंताप्रतीची भक्ती वाढत आहे, हे या प्रसंगातून पुन्हा एकदा अधोरेखित होते.

असे जरी असले, तरी मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे भाविकांनी भक्तीभावाने अर्पण केलेल्या पैशाचा विनियोग मात्र योग्य पद्धतीने होत नाही. सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे होत आहेत. मंदिरांची भूमी, पैसे, दागिने, वस्तू अशा सर्वच क्षेत्रांमध्ये घोटाळे होत आहेत. यातून संबंधितांमध्ये भगवंताप्रती भाव नाही, हेच दिसून येते. कुठे पतीच्या मृत्यूनंतर त्याची इच्छा म्हणून पत्नीने भगवंताच्या चरणी १ कोटी रुपये अर्पण करणे आणि कुठे देवाचेच असलेले पैसे स्वतःचे म्हणून वापरणे, त्याचा हिशोब न ठेवणे आणि त्याविषयी काहीही न वाटणे ! हिंदु धर्माची महान परंपरा असलेल्या भारतासारख्या देशामध्ये मंदिरांमध्ये भ्रष्टाचार होणे, हे दुर्दैवी आहे. निधर्मी राज्यप्रणालीचा उदोउदो करून शासनकर्त्यांनी एकही क्षेत्र भ्रष्टाचाराविना सोडलेले नाही, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. ही सर्व स्थिती पालटण्यासाठी भक्तांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

समाजामध्ये असणार्‍या सश्रद्ध व्यक्तींनी केवळ मंदिरांमध्ये अर्पण करून न थांबता अर्पण केलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग होतो ना, याकडेही लक्ष द्यायला हवे. ‘भगवंत आहे आणि तो सर्व पहात आहे’, हा भाव भक्तांमध्ये असतो. भक्त नसणार्‍यांना ही जाणीव नसते; परंतु त्यांच्याकडून होणारे अयोग्य कर्म थांबवणे, हे भक्तांचेच कर्तव्य आहे आणि हेच खरे धर्माचरण आहे.

– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी