पणजी, २९ जुलै (वार्ता.) – गोवा शासन चालू शैक्षणिक वर्षात शाळेचे प्रत्यक्ष वर्ग (‘ऑफलाईन’) भरवण्याच्या सिद्धतेत नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ (‘आय्.सी.एम्.आर्.’ – ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’) या संस्थेच्या वतीने शाळेचे प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यासाठी नियमावली सिद्ध केल्यानंतरच प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत ‘ऑनलाईन’ शिक्षण आणि इंटरनेट जोडणी’ या विषयावरील लक्षवेधी सूचनेवर बोलतांना दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रांमधील (डोसमधील) अंतर अल्प करण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. सर्व शालेय कर्मचार्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यास पुढे शाळा प्रत्यक्ष चालू करतांना याचा लाभ होईल.’’
केंद्राकडून गोव्यासह देशातील अन्य १६ राज्यांमध्ये ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्याचे आश्वासन
केंद्राने गोव्यासह देशातील अन्य १६ राज्यांमध्ये ‘भारतनेट’ प्रकल्प ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ (पी.पी.पी. – पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर राबवण्याचे आश्वासन दिले आहे. ही योजना एकूण २९ सहस्र ४३० कोटी रुपये खर्चून ३ लक्ष ६० सहस्र गावांमध्ये राबवण्यात येणार आहे. ‘जी.बी.बी.एन्’ नेटवर्कचे ‘वायफाय’ शाळांमध्ये वापरणे शक्य नाही !
‘गोवा ब्रॉडबँड नेटवर्क’ (‘जी.बी.बी.एन्’)चे ‘बँडव्हिड्त’ अल्प असल्याने हे नेटवर्क शाळांमध्ये वापरणे शक्य नाही. हे नेटवर्क वापरण्याचा प्रयोग ५ शाळांमध्ये करण्यात आला होता. यापूर्वीच्या शासनाने ‘जी.बी.बी.एन्’च्या ‘पी.पी.पी.’ मॉडेलचे रूपांतर ‘ बांधा, वापरा, हस्तांतर करा’ (बूट – बिल्ड ऑन ऑपरेट ट्रान्सफर) यामध्ये केले. यामुळे शासनाला ‘जी.बी.बी.एन्’ नेटवर्क चालवणार्या ‘यु.टी.एल्.’ला आतापर्यंत २१८ कोटी रुपये द्यावे लागले आहेत, तर प्रतिमास ‘यु.टी.एल्.’ला २० कोटी रुपये द्यावे लागत आहेत. या चुकीच्या धोरणामुळे ‘जी.बी.बी.एन्’च्या साधनसुविधेचा मालकीहक्क शासनाकडे नसून तो ‘यु.टी.एल्.’कडेच आहे.’’
६० ते ७० भ्रमणभाष मनोरे बसवले जात आहेत
‘टेलिकॉम’ धोरण घोषित झाल्यानंतर राज्यभरात १४५ भ्रमणभाष मनोरे (टॉवर) बसवण्यासाठी शासनाकडे अर्ज आले आहेत आणि सुमारे ६० ते ७० भ्रमणभाष मनोरे बसवण्याच्या कामाला प्रारंभही झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे दिली.