पुढील ४ दिवसांत कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पुन्हा अतीवृष्टी होणार ! – हवामान विभागाची चेतावणी 

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – गेल्या आठवड्यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे अतीवृष्टीने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेकांची घरे, दुकाने आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या २ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतांनाच हवामान विभागाने पुढील ४ दिवसांत राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ३० जुलै या दिवशी अतीवृष्टीची शक्यता आहे, तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील ४ दिवस, तर पुणे अन् सातारा जिल्ह्यांत पुढील ३ दिवस अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.