आपत्काळात तातडीच्या बचावकार्यासाठी कोकणात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक नियुक्त करावे ! – कु. अदिती तटकरे, राज्य उद्योगमंत्री

मुंबई – रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी मागील ५ वर्षांत ३ वेळा चक्रीवादळ आले होते. २-३ वेळा पूर आला होता. अशा वेळी स्थानिक पातळीवरील पथकांना बचावकार्य करण्यास अडचण येते. अशा आपत्काळात तातडीच्या बचावकार्यासाठी कोकणामध्ये कायमस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक नियुक्त करावे, अशी मागणी राज्य उद्योगमंत्री कु. अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. २८ जुलै या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली असून त्यासाठी राज्य शासन भूमी देण्यास सिद्ध आहे, अशी माहिती या वेळी दिली.

या वेळी अदिती तटकरे म्हणाल्या, ‘‘नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक बचाव पथकाला मर्यादा येतात. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक असेल, तर अनेकांचे प्राण वाचवता येतील. पुरामुळे पोलादपूर, महाड, चिपळूण पाण्याखाली गेले. बाजारपेठेत २२ ते २५ फूट पाणी होते. त्यामुळे तेथील व्यापारांची मोठी हानी झाली. पूरग्रस्तांना शासनाकडून अधिकाधिक साहाय्य मिळावे. परिस्थिती पूर्वपदावर येणार्‍यास राज्यशासन पाठबळ द्यावे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: पूरग्रस्त भागाची पहाणी केली असून शासनाकडून सर्वतोपरी साहाय्य मिळेल, असा विश्वास आहे.’’

खासगी शाळांच्या शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्यात येणार ! – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

मुंबई – खासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के इतकी कपात करण्याचा निर्णय २८ जुलै या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अध्यादेश लवकरच काढण्यात येईल. राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कार्यवाही न झाल्यास संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.