कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणी तिसर्‍या आरोपीस अटक !

आरोपीस ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पुणे, २८ जुलै – प्रसिद्ध कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी त्यांचे व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरे यांच्यासह ५ जणांवर गुन्हा नोंद झाला. धर्मेंद्र रावत यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या आधी चंदन ठाकरे यांना, तर साप्ते यांना धमकावणार्‍या राकेश मौर्य यांना अटक केली.

आरोपींनी संगनमत करून साप्ते यांना जिवे मारण्याची, तसेच कामगारांना कामावर येऊ न देण्याची आणि व्यावसायिक हानी करण्याची धमकी दिली. बळजोरीने १० लाख रुपये आणि प्रत्येक प्रकल्पामध्ये १ लाख रुपये यांची मागणी केली. आरोपींनी साप्ते यांना अडीच लाख रुपये बळजोरीने देण्यास भाग पाडले, तसेच आरोपी चंदन ठाकरे यांनीही विश्वासघात आणि फसवणूक करून आर्थिक हानी केली. आरोपींच्या छळाला कंटाळल्याने साप्ते यांनी ताथवडे येथील रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.