|
कोल्हापूर – आपण प्रत्येक जण वैयक्तिक स्तरावर राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही ना काही करत असतो. आता त्याच्या पुढे जाऊन जे जे हिंदुत्वासाठी कार्य करतात, त्यांना कायदेशीर साहाय्य करणे, मार्गदर्शन करणे, विविध क्षेत्रांत होणारे भ्रष्टाचार आणि घोटाळा उघडकीस आणण्यासाठी माहिती अधिकार वापरणे, अशा कृती आपण केल्या पाहिजेत. काळाची गती आणि हिंदुत्वावर होणारे आक्रमण पहाता आपण आपले कार्यक्षेत्र वाढवले पाहिजे. २-४ कथित पुरोगामी किंवा साम्यवादी यांच्या हत्या झाल्यावर टाहो बडवणारे कथित बुद्धजीवी नक्षलवाद्यांनी गेल्या काही वर्षांत १४ सहस्र सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या, त्याविषयी कधीही काहीही बोलत नाहीत. नक्षलवादी हे दुसरे कुणी नसून मूळचे ‘साम्यवादी’च आहेत. फादर स्टॅन स्वामींसारखे लोक सामाजिक कार्याच्या बुरख्याखाली नेहमीच सत्य दडपतात. त्यामुळे या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात आपल्याला वैध मार्गाने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन अधिवक्ता परिसंवादा’त बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या परिसंवादासाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा येथून ८० अधिवक्ता उपस्थित होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अधिवक्ता प्रीती पाटील यांनी केले.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की,
१. जे हिंदुत्वनिष्ठ प्रामाणिकपणे हिंदुत्वासाठी काम करतात, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे. अशा हिंदुत्वनिष्ठांना आपण योग्य तो कायदेशीर आधार दिल्यास त्यांच्या मनात आपल्याविषयी अधिक विश्वासार्हता निर्माण होईल अन् ते हिंदुत्वाचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी उद्युक्त होतील.
२. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी त्यांच्या जीवाची बाजी लावून गडकोट उभारले. अशा गडकोटांपैकी विशाळगड (कोल्हापूर), देवगड किल्ला (सिंधुदुर्ग) यांसारख्या अन्य किल्ल्यांची दुरवस्था पाहून, तसेच तेथे झालेली धर्मांधांची अतिक्रमणे पाहून पुरातत्व विभाग निद्रीस्त आहे, असेच म्हणावे लागेल.
३. एकूणच अधिवक्त्यांच्या कार्याची व्याप्ती पहाता ही एक चळवळ असून प्रत्येकाने त्यांच्या परीने वाटा उचलायला हवा.
तणावमुक्त जीवनासाठी साधनाच करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्थाकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या आपल्या प्रत्येकावरच तणाव आहे. अनेक उद्योजकांचे व्यवसाय बंद आहेत. रुग्ण वाढल्याने आधुनिक वैद्यांना ताण आहे. अधिवक्त्यांचे खटले बंद झाल्याने त्यांच्यावर ताण आहे. विज्ञान आपल्याला मर्यादित सुख देऊ शकते; मात्र तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्याला साधनाच करणे आवश्यक आहे. आपल्याला अनेक जन्मानंतर मानव जन्म मिळतो. त्याचे आपण सार्थक केले पाहिजे. आपल्याला धर्मशिक्षण नसल्याने धर्म-अध्यात्म यांचे महत्त्व कुणी समजावून सांगितलेले नाही. सध्या काळानुसार कुलदेवतेचा नामजप आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप आपण प्रत्येकाने प्रतिदिन केला पाहिजे. |