पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील ११३ जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता, तर १ लाख ३५ सहस्र ३१३ नागरिकांचे स्थलांतर !

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी २ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित !

मुंबई – पूरग्रस्त परिस्थितीचा फटका राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना बसला असून राज्यातील ११३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. बेपत्ता असलेल्या १०० नागरिकांचा अद्यापही शोध लागलेला नाही. पूरस्थितीमुळे राज्यातील १ लाख ३५ सहस्र ३१३ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी सरकारकडून प्रत्येकी २ कोटी रुपये, तर अन्य पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये इतके अर्थसाहाय्य घोषित करण्यात आले आहे. पुरामुळे राज्यातील ३ सहस्र २२८ पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

मृत व्यक्तींमध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ५२, तर रत्नागिरी जिल्ह्यातील २१ जणांचा समावेश आहे. सातारा १३, ठाणे १२, कोल्हापूर ७, सिंधुदुर्ग २, मुंबई ४ आणि पुणे येथील २ जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता झालेल्या नागरिकांमध्ये रायगड येथील सर्वाधिक ५३ जण, तर त्या खालोखाल सातारा २७, तर रत्नागिरीमधील १४ जण बेपत्ता आहेत.

सांगली येथील सर्वाधिक ७८ सहस्र १११ नागरिकांचे स्थलांतर !

पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक ७८ सहस्र ११ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. यासह कोल्हापूर जिल्ह्यातील ४० सहस्र ८८२, ठाणे ६ सहस्र ९३०, सातारा ५ सहस्र ६५६, सांगली ७८ सहस्र १११, रत्नागिरी १ सहस्र २००, सिंधुदुर्ग १ सहस्र २७१, रायगड १ सहस्र, तर पुणे येथील २६३ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अद्यापही बंदच 

  • कोल्हापुरात काही प्रमाणात पूर ओसरण्यास प्रारंभ    

  • सांगलीत पुराचा विळखा कायम

कोल्हापूर, २५ जुलै (वार्ता.) – गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूर काही प्रमाणात ओसरण्यास प्रारंभ झाला आहे. २५ जुलैला सायंकाळी ५ वाजता पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ५१ फूट इतकी नोंदवण्यात आली. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अद्यापही बंदच आहे. सांगलीत मात्र पुराचा विळखा कायम असून २५ जुलैला सकाळी ११ वाजता कृष्णा नदीवरील आयर्विन पूल येथे पाण्याची पातळी ५४ फूट ९ इंच इतकी नोंदवण्यात आली होती. यामुळे सांगली महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासह निम्मे सांगली शहर पाण्याखाली गेले आहे. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात २४ जुलै या दिवशी ६५ सैनिकांचे एक पथक  उपस्थित झाले. यापूर्वी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची ४ पथके जिल्ह्यात उपस्थित झाली आहेत.

सांगली जिल्हा

सांगलीतील मारुति रस्त्यावर साचलेले पाणी आणि त्यात अर्ध्याहून अधिक प्रमाणात बुडलेली दुकाने

१. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी ५२ फुटांपेक्षा अधिक होणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात तसे न होता पाणी वाढतच गेले.

२. जिल्ह्यात ९४ गावे पूरबाधित असून १ लाख ५ सहस्रांहून अधिक लोकांचे, तर २४ सहस्र गुरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. ६० शासकीय आणि ६ सामाजिक संस्थांची निवारा केंद्रे चालू असून त्यात ३ सहस्र ४०० पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे. त्यांना ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’, तसेच भोजन पुरवण्यात येत आहे.

३. महापुराने २३ सहस्र ५०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यात प्रामुख्याने सोयाबीन, ऊस अशा पिकांना फटका बसला आहे. हानीच्या अनुषंगाने पंचनाम्यासाठी पथके सिद्ध करण्यात आली आहेत.

४. नदीतील पाणी उपसा केंद्र पाण्याखाली गेल्याने शहरातील विश्रामबाग, कुपवाड या भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही प्रमाणात दुधाची टंचाईही भासत आहे.

कोल्हापूर जिल्हा

१. सांगली फाटा येथे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी अत्यंत संथगतीने न्यून होत असून गेल्या २४ घंट्यांत पाणी पातळी साडेतीन फुटांनी अल्प झाली असली, तरी अद्यापही हा महामार्ग बंदच आहे. हा महामार्ग गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने अद्यापही कोल्हापूरचा बाहेरच्या जिल्ह्यांशी संपर्क बंदच आहे आहे. याच समवेत रेल्वे मार्गही अद्यापही बंदच आहे.

२. दुपारी १२ वाजता शिरोली-किणी-सातारा सर्व प्रकारची वाहतूक चालू झाली आहे, तर किणी पथकर नाका ते शिरोली मार्गावर दूध, डिझेल-पेट्रोल अशी अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडली जात आहेत.

३. राधानगरी धरण उच्चतम पातळीपर्यंत भरले असून त्याची

  स्वयंचलित द्वारे उघडली असून ७ सहस्र क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीत चालू झाला आहे.


करंजफेन (जिल्हा कोल्हापूर) येथे दरड कोसळल्यामुळे पेट्रोलपंप ढिगार्‍याखाली !

कोल्हापूर – येथील शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन गावात दरड कोसळल्याने संपूर्ण पेट्रोलपंप मातीच्या ढिगार्‍याखाली गाडला गेला आहे. या परिसरात दरड कोसळण्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे सहस्रो एकर शेतीची हानी झाली आहे. तसेच शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडावरील भूमीसुद्धा ७-८ फूट खचली असल्याने विशाळगडाला धोका निर्माण झाला आहे. गगनबावडा तालुक्यातील अंदुर धुंदवडे रस्ता, तसेच पणदूर रस्ता खचला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मधील कोल्हापूर ते पुणे येथील रस्ता अनेक ठिकाणी बंद आहे.