२ पोलीस अधिकारी निलंबित !
निर्बंध लागू असतांनाही डान्सबार चालू ठेवले जातात, यात पोलीसच अधिक दोषी आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे दोषी पोलिसांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फच करायला हवे !
ठाणे – कोरोनाच्या संकटामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. दुपारी ४ वाजल्यानंतर दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत; मात्र असे असतांनाही ठाणे शहर परिसरातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले आम्रपाली आणि अँटीक पॅलेस हे २ डान्सबार अन् वर्तकनगर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येणारा नटराज डान्सबार बिनदिक्कतपणे चालू होते. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गंभीर नोंद घेत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याविषयी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी प्राथमिक चौकशीच्या आधारावर नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, तसेच नौपाडा विभागाच्या साहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. आम्रपाली, अँटीक पॅलेस आणि नटराज या तिन्ही बारचा परवाना रहित करण्यात आला आहे. (राज्याच्या गृहमंत्र्यांनी नोंद घेतल्यावर कारवाई होते, यापेक्षा दुर्दैव ते काय ! – संपादक)