भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने ईदनिमित्त अनुमती दिलेल्या तात्पुरत्या पशूवधगृहांना उच्च न्यायालयाकडून स्थगिती !

गौ ज्ञान फाऊंडेशनच्या प्रयत्नांना यश !

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने ईदनिमित्त २१ ते २३ जुलै या कालावधीत तात्पुरत्या ३८ पशूवधगृहांना अनुमती दिली होती. महानगरपालिकेच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात गौ ज्ञान फाऊंडेशनच्या वतीने राजेश पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. यावर २० जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी वरील निर्णय दिला.

याविषयी गौ ज्ञान फाऊंडेशनच्या वतीने न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेत महानगरपालिकेने दिलेली अनुमती अवैध असल्याचे नमूद करण्यात आले होते. महानगरपालिकेचा निर्णय अस्तित्वात असलेला अन्न सुरक्षा कायदा, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम, महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन नियम यांच्या विरोधात आहे, तसेच सर्वाेच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे निकाल पहाता महानगरपालिकेचा निर्णय अवैध असल्याचे म्हटले होते