लेखापरीक्षण अहवालात त्रुटी ठेवल्याने नाटळ (कणकवली) केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख भागोजी अडुळकर निलंबित

कणकवली – लेखापरीक्षण अहवालात त्रुटी ठेवल्याचा, तसेच वारंवार सूचना देऊनही तो अहवाल सादर न केल्याचा ठपका ठेवत नाटळ केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख भागोजी अडुळकर यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.

कणकवली तालुक्यातील नाटळ केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख भागोजी अडुळकर यांनी वर्ष २०१९ – २०२० या कालावधीत लेखापरीक्षण अहवाल वेळेत सादर केलेला नाही. याविषयी त्यांना वारंवार संधी देऊनही निधी खर्च केल्याची माहिती त्यांनी दिली नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी नाटक केंद्रशाळा आणि या केंद्रशाळेच्या अंतर्गत येणार्‍या अन्य शाळा यांना भेटी दिल्या. या वेळी ‘केंद्रप्रमुख भागोजी अडुळकर यांनी दैनंदिन उपस्थितीची नोंद ठेवली नव्हती आणि केंद्रांतर्गत येणार्‍या शाळांना प्रशासनाकडून देण्यात येणारी माहिती पुरवली नाही, तसेच कोरोनाविषयीचा केंद्रांचा आढावा प्रशासनाला सादर केलेला नाही’, असे आंबोकर यांनी सांगितले.