पोखरण (राजस्थान) येथील सैन्यतळाला भाजी पुरवणारा हबीब खान नावाचा देशद्रोही शत्रूराष्ट्र पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून अत्यंत गोपनीय कागदपत्रे आणि सैन्यतळाचे रेखाचित्र जप्त करण्यात आले आहे. धर्मांधांची पाकिस्तानची असलेली बांधीलकी पहाता खरेतर त्यांना अशा संवेदनशील ठिकाणी प्रवेश द्यायलाच नको होता. याविषयी देशातील सैन्याच्या अन्य तळांवर तरी तातडीने दक्षता घेतली पाहिजे. हबीब हा कधीपासून हेरगिरी करत आहे, हे अद्याप उघड झालेले नाही; परंतु त्याला आगरा येथे तैनात असलेला परमजित कौर हा सैनिक साहाय्य करत होता, असेही समोर आले आहे. हा प्रकार अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत घातक आहे.
जेथे सैन्यतळातील हेरगिरीविषयी देशाच्या आणि सैन्याच्या गुप्तचर यंत्रणांना थांगपत्ता लागत नसेल, तेथे अन्य संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेची काय स्थिती असेल ? याचा विचारच न केलेला बरा ! शत्रू आता जेथे ‘ड्रोन’च्या माध्यमातून हवेतूनही आक्रमण करू पहात असेल, तेथे गुप्तचर यंत्रणांचे असे अपयश चिंताजनक आहे. हेरगिरीची अशी प्रकरणे वारंवार समोर येतात, याचा अर्थ देशद्रोह्यांवर ना कायद्याचा वचक आहे, ना शासनकर्त्यांचा; कारण अशा प्रकारचा देशद्रोह करणार्यांवर म्हणावी तशी कठोर कारवाई होतांना दिसत नाही. देशद्रोह करणार्यांवर तात्काळ जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी प्रसंगी कायदे आणखी कठोर केले पाहिजेत. अशी अनेक प्रकरणे उघड होतात आणि कालांतराने जनतेच्या विस्मृतीत जातात. हेच देशद्रोह्यांना फावते. हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत घातक आहे, हे सरकारने वेळीच जाणावे आणि त्यासाठी वेळीच कठोर पावले उचलावीत, यातच देशहित आहे !