क्रुरकर्मा टिपू सुलतान याचे नाव मुंबईतील गोवंडी भागातील एका उद्यानाला देण्याचा घाट घातला गेल्याचे महानगरपालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत उघड झाले. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी बाजार आणि उद्यान समितीकडे पत्राद्वारे या उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी केली. जे टिपूप्रेम काल-परवापर्यंत कर्नाटक किंवा अन्य एखाद्या राज्यात पहायला मिळत होते, ते आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. येथील काही धर्मांध लोकप्रतिनिधींमध्ये टिपूप्रेम दिसू लागले आहे. हा प्रस्ताव म्हणजे महाराष्ट्रावर घोंघावणारे मोठे संकट आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. रुक्साना सिद्दीकी यांच्याकडून या उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अर्थातच या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तशी शिफारस बाजार आणि उद्यान समितीकडे केली; म्हणजे या पापात महानगरपालिकेचे आयुक्तही बिनबोभाटपणे सहभागी झाले होते. आयुक्तांनी हीच गतीमानता जर मुंबईत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाच्या वेळी दाखवली असती, तर मुंबई तुंबली नसती. मुळात आयुक्तपदावरील एखाद्या शासकीय अधिकार्याला महानगरपालिकेच्या पर्यायाने जनतेच्या वास्तूला कुणाचे नाव दिल्यावर वाद निर्माण होतील, हेही कळू नये ? कि कळूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, हे जनतेसमोर आले पाहिजे. जसे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व पोलिसांचे आहे, तसे ते निर्माण होऊ न देण्याचे दायित्व महानगरपालिकेच्या आयुक्तांचे नव्हे का ? या नामांतरामुळे होऊ शकणार्या संभाव्य परिणामांचा त्यांनी विचार केला होता का ? आयुक्तांनी या उद्यानाला असे नाव देण्याचा प्रस्ताव संमतीसाठी बाजार आणि उद्यान समितीकडे पाठवण्यापूर्वी क्रूरकर्मा टिपू सुलतानचा इतिहास जाणून घेणे, हे त्यांचे दायित्व होते. ते त्यांनी पार पाडलेले नाही. जर त्याचा इतिहास ठाऊक असूनही त्यांनी हा प्रस्ताव पुढे पाठवला असेल, तर ते निश्चितच क्षम्य नाही. तो हिंदुद्वेषच ठरेल. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनीही टिपू सुलतानने हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार त्यांना मान्य आहेत का ? हे एकदा स्पष्ट केले पाहिजे.
या उद्यानाच्या नामांतराचा विषय बाजार आणि उद्यान समितीच्या सभेत चर्चेला आल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी या नामांतरास कडाडून विरोध केला. इतकेच नव्हे, तर हा प्रस्तावच कायमचा रहित करण्याची मागणी त्यांनी केली. शिवसेनेच्या गोवंडी येथील नगरसेविका ऋतुजा तारी यांनी उद्यानाचे काम अपूर्ण असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनीही नामांतराचा प्रस्ताव परत पाठवण्याची मागणी केली. शेवटी हा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी फेटाळून लावत पालिका प्रशासनाकडे परत पाठवला. क्रूरकर्मा टिपू सुलतान हा कट्टर इस्लामी आणि पराकोटीचा हिंदुद्वेषी शासक होता. त्याने एक फतवा काढून एका दिवसात लाखो हिंदूंचे धर्मांतर केले आहे. सहस्रो हिंदु स्त्रियांवर बलात्कार केले आहेत. ज्या हिंदूंनी इस्लाम स्वीकारला नाही, अशा सहस्रो हिंदूंची त्याने अमानुषपणे आणि अत्यंत क्रुरपणे हत्या केली आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत हा इतिहासच हिंदूंना शिकवला गेला नाही, उलट टिपू सुलतान किती चांगला होता, हेच धडे पाठ्यपुस्तकांतून रंगवण्यात आले. दूरचित्रवाणीच्या माध्यमांतूनही हेच हिंदूंच्या मनावर बिंबवण्यात आले. यास देशावर सर्वाधिक काळ राज्य करणारी काँग्रेस सर्वाधिक उत्तरदायी आहे. आज देशात अनेकांना फुटणारे टिपूप्रेमाचे घातक उमाळे ही त्याची विषारी फळे आहेत. अशा व्यक्तीच्या नावाने उभारल्या जाणार्या वास्तू या हिंदुद्वेषाची स्मारके ठरतील. या प्रस्तावाच्या निमित्ताने कुणाच्या मनात काय शिजते आहे आणि त्याला कुणाकुणाची साथ आहे, हेही महाराष्ट्रासमोर आले. या उद्यानाच्या नामांतराचा प्रस्ताव फेटाळला याचा अर्थ ‘हे संकट टळले’, असा होत नाही. आज ना उद्या ते पुन्हा येऊ शकते. त्यामुळे टिपूप्रेमींचा हिंदुद्वेष रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांना सदैव सज्ज रहावे लागेल, हे मात्र निश्चित !