महाराष्ट्रात इयत्ता १० वीचा निकाल ९९.९५ टक्के, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के !

राज्याच्या इतिहासात प्रथमच सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे धोरण

मुंबई – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १० वीचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १६ जुलै या दिवशी ‘ऑनलाईन’ माध्यमातून हा निकाल घोषित केला आहे. राज्यातील १५ लाख ७५ सहस्र ८०६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील १५ लाख ७४ सहस्र ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यात कोकण विभागाचा निकाल १०० टक्के इतका लागला.

या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत सरकारने इयत्ता १० वीची परीक्षा घोषित केली होती; मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे परीक्षा रहित करावी लागली. त्यामुळे मंडळाकडून प्रत्यक्ष परीक्षा न घेता या वर्षी इयत्ता १० वीच्या अंतर्गत परीक्षेचे मूल्यमापन, गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण आणि इयत्ता ९ वीच्या वार्षिक परीक्षेत प्राप्त झालेले गुण या निकषांवरून विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण देण्यात आले.

राज्यातील २२ सहस्र ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के !

निकालामध्ये मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.९६ टक्के, तर मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.९४ टक्के इतके आहे. राज्यातील २२ सहस्र ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. पुणे, मुंबई, संभाजीनगर, नाशिक आणि लातूर या विभागांचा निकाल ९९.९६ टक्के इतका लागला. नागपूर ९९.८४ टक्के, कोल्हापूर ९९.९२ टक्के आणि अमरावती ९९.९८ टक्के इतका निकाल लागला.

५ संकेतस्थळांची गती मंदावल्याने निकाल पहाण्यासाठी विद्यार्थ्यांचा ४ घंट्यांहून अधिक काळ खोळंबा !

मुंबई – इयत्ता १० वीचा निकाल दुपारी १ वाजता ५ संकेतस्थळांवर घोषित झाला. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात संकेतस्थळे उघडली गेल्याने त्यांची गती मंदावली. त्यामुळे विद्यार्थ्यांना ४ घंट्यांहून अधिक काळ वाट पहावी लागली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ‘अर्ध्या घंट्यात संकेतस्थळे पूर्ववत होतील’, असे सांगितले. काही कालावधीनंतर संकेतस्थळे चालू झाली; मात्र काही वेळाने पुन्हा गती मंदावली. ही समस्या प्रतिवर्षी येत असूनही मंडळाने त्यावर ठोस उपाययोजना काढलेली नाही. याविषयी विद्यार्थी आणि पालक यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला.