राज्यातील निर्बंध शिथिल करण्याविषयी ‘टास्क फोर्स’ समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेले निर्बंध आता शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. त्यामुळे दुकाने आणि उपाहारगृहे यांच्यावरील निर्बंध टप्प्याटप्प्याने कसे हटवता येतील, याविषयीचा सविस्तर अहवाल ‘टास्क फोर्स’ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे.

मुख्यमंत्र्यांनी ‘राज्य टास्क फोर्स’मधील तज्ञ आधुनिक वैद्य आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून निर्बंध शिथिल करण्याविषयी सविस्तर अहवाल मागवला होता. राज्यातील कोरोनाचा ‘पॉझिटिव्हीटी’ दर, ‘बेड्स’ची संख्या आणि इतर काही निकष यांच्या आधारे हा अहवाल सिद्ध करून तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. अहवालातील शिफारशीनुसार राज्यात सर्व आस्थापने टप्प्याटप्प्याने चालू करतांना  त्यांची वेळ आणि उपस्थिती यांची मर्यादाही वाढवण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात उपाहारगृहे उघडण्यासाठी सवलती घोषित केल्या जाणार आहेत. उपाहारगृहे चालू ठेवण्याची वेळ रात्री १० वाजेपर्यंत केली जाणार आहे, तर ५० टक्क्यांची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाणार असल्याचे समजते. यासाठी उपाहारगृहांमधील सर्व कर्मचार्‍यांचे लसीकरण बंधनकारक असेल, तसेच लसीकरण झालेल्या ग्राहकांना उपाहारगृहांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यासंदर्भात विचार चालू आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.