सांगली, १४ जुलै (वार्ता.) – सततच्या दळणवळण बंदीमुळे त्रस्त झालेल्या व्यापार्यांनी सांगलीत १४ जुलैला ‘भीक मागा’ आंदोलन केले. दळणवळण बंदी उठवायची नसेल, तर सरकारने कर्मचारी वेतन, वीजेदयक, घरपट्टी-पाणीपट्टी, घरखर्च, कर्जाचे हप्ते भागवण्यासाठी व्यापार्यांना भीक द्यावी, अशी मागणी या वेळी व्यापार्यांनी केली. बालाजी चौक ते टिळक चौक रस्त्यावर व्यापार्यांची मानवी साखळी करण्यात आली होती. भाजपसह सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. या आंदोलनात विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, युवा नेते पृथ्वीराज पवार, नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि युवराज बावडेकर, नगरसेविका सौ. उर्मिला बेलवकर यांसह अन्य उपस्थित होते.
तात्काळ बाजारपेठ खुली करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार
संपूर्ण बाजारपेठ या दळणवळण बंदीमुळे उद्ध्वस्त झाली आहे. एकीकडे विविध राजकीय पक्षांच्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे आणि दुसरीकडे नियम पाळूनही व्यापार्यांना सरकार धंदा करण्यास अनुमती देत नाही. आघाडी सरकारमध्ये ताळमेळ नाही, निर्णय घेतले जात नाहीत. दळणवळण बंदीमुळे व्यापार्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. तरी नियम-अटी घालून सरकारने तात्काळ बाजारपेठी खुली करावी, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी या वेळी केली.