हिंदु धर्माविषयी होत असलेला दुष्प्रचार हा वैचारिक आतंकवादच ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदूच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणारी अधिवक्त्यांची संघटना हिंदु विधीज्ञ परिषद !

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या १० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य निर्माणामध्ये अधिवक्त्यांचे योगदान’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद !

पुणे – गणेशोत्सवामुळे जलप्रदूषण होते, दिवाळीत फटाके फोडल्यानंतर वायू अन् ध्वनी प्रदूषण होते, असा प्रचार मोठ्या प्रमाणात करून हिंदूंच्या श्रद्धास्थानांना अपकीर्त केले जाते. जेणेकरून हिंदूंमध्ये स्वतःच्या धर्माविषयी न्यूनगंड निर्माण व्हावा आणि जे काही चांगले आहे, ते केवळ ख्रिस्ती-मुसलमान पंथियांचे आहे, हे सर्व दर्शवण्यासाठी सतत खटाटोप चालू असतो. हा एक वैचारिक आतंकवादच आहे. मशिदींवरील भोंग्यांविषयी चर्चा होत नाही; मात्र हिंदूंच्या सणांतील ध्वनीप्रदूषणावर चर्चा होते. हा सुद्धा वैचारिक आतंकवादच आहे, असे रोखठोक प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या १० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य निर्माणामध्ये अधिवक्त्यांचे योगदान’ या विषयावरील ‘सनातन संवाद’ या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

या कार्यक्रमात हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आर्. व्यंकटरमणी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. हा ऑनलाईन कार्यक्रम २ सहस्र ८००हून अधिक जणांनी पाहिला.

अधिवक्ता आर्. व्यंकटरमणी

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आर्. व्यंकटरमणी यांनी एका चलत्चित्राद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. अधिवक्ता आर्. व्यंकटरमणी म्हणाले की, भारताला वैभवशाली सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. तो नव्या राज्यघटनात्मक भाषेत समाजात पोचवायला हवा.


प्रत्येक अधिवक्त्याने हिंदूंना सर्वच स्तरांवर सहकार्य करायला हवे ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

१. हिंदु कार्यकर्त्यांना खोट्या खटल्यांमध्ये गुंतवण्यासाठी केवळ पोलीस आणि प्रशासनच नव्हे, तर शासनकर्तेही सहभागी असतात. नंदुरबार येथे गोरक्षकांनी गोमांस पकडले. त्या वेळी गोमांस तस्करांवर कारवाई करायची सोडून हिंदु गोरक्षकांवर कारवाई करत त्यांना तडीपार करण्यात आले. त्यावर हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांनी त्याविरोधात याचिका प्रविष्ट केल्यानंतर तडीपारीची शिक्षा रहित करण्यात आली. उलट विनाकारण शिक्षा भोगावी लागली; म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात मानहानीची याचिका प्रविष्ट केली. उच्च न्यायालयाने ‘त्या दोन गोरक्षकांना प्रत्येक याचिकेनुसार १० सहस्र रुपये पोलिसांनी द्यावेत’, असा निकाल दिला. यातून आम्हाला हिंदु धर्माची सेवा केल्याचा आनंद तर झालाच, तसेच हिंदु कार्यकर्त्यांचे मनोबल, धैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यास सहकार्य झाले. त्यांना प्रेरणा मिळाली. प्रत्येक अधिवक्त्याने हिंदूंना सर्वच स्तरांवर सहकार्य करायला हवे.

२. काही वर्षांपूर्वी सातारा येथील तथाकथित सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात एक याचिका प्रविष्ट केली. ज्यामध्ये ‘सार्वजनिक गणेशाची मूर्ती केवळ ४ इंचाची असावी, मूर्तीदान करावे, पाण्यात विसर्जित करू नये, प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी असावी, निर्माल्यापासून खत सिद्ध करावे’, अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. खरे तर न्यायालयाला सण-उत्सवांवर मर्यादा घालण्याचा अधिकार नसतो. या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषदेने एक हस्तक्षेप याचिका प्रविष्ट केली. यामुळे दाभोलकर यांनी प्रविष्ट केलेली याचिका रहित करण्यात आली. तरीही ‘पडलो तरी नाक वर’ या म्हणीप्रमाणे त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे जाऊन ‘आमची याचिका संमत केली आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत’, असे धादांत खोटे सांगितले. परिणामी गणेश मूर्तीकारांचा व्यवसाय धोक्यात आला. तेव्हा आम्ही प्रसारमाध्यमांसमोर जाऊन दाभोलकर धांदात खोटे बोलत असल्याचे सांगितले. आपण सतर्क राहून अशा प्रकारच्या याचिकांचे खंडण करायला हवे.


हिंदूंची मंदिरे कह्यात घेणे, हे एक विचारपूर्वक रचलेले षड्यंत्र ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

१. हिंदूंची मंदिरे कह्यात घेणे, हे एक विचारपूर्वक रचलेले षड्यंत्र आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रक्मिणी मंदिर, तुळजापूरचे श्री भवानीदेवी मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीतील श्री साईबाबा देवस्थान, तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील ३ सहस्र ६७ मंदिरांचे सरकारीकरण करून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सिद्ध करण्यात आली आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध मुकाम्बिकादेवीच्या मंदिरात नियुक्त असलेल्या शासकीय अधिकार्‍याने ४ किलो २० ग्रॅम सोन्याचे ९ हार चोरले. हिंदु विधीज्ञ परिषदेने माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती घेतली, तेव्हा या सरकारीकरण झालेल्या मंदिरांतून घोटाळे झाल्याचे दिसून आले.

२. अशा प्रकारे आपण माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मिळवून सरकारीकरण झालेल्या मंदिरातील घोटाळे बाहेर काढून त्याचे अन्वेषण करण्याची मागणी करू शकतो. मंदिरांवरील सरकारी हक्क काढून ती भक्तांच्या स्वाधीन केली जावीत, यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेचा लढा चालूच आहे.

३. भारतातील कायदे हे सर्वांसाठी समान आहेत. कायद्याचे उल्लंघन करून पहाटे ५ ते रात्री १० या काळात मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनीप्रदूषण होते. लोकांना त्याचा त्रास होतो. कायदा आहे; पण कारवाई होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी ध्वनीप्रदूषणाविषयी तक्रारी करायला हव्यात.

४. कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी न्यायालये बंद आहेत. अधिवक्ता मानसिक आणि आर्थिक तणावात आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी साधना केली पाहिजे. यासाठी हिंदु जनजागृती समितीने साधना सत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग यांचे आयोजन केले आहे. या माध्यमातून मनातील तणाव कसा दूर करावा ? त्यासाठी प्रयत्न कसे करावेत ? यांविषयी मार्गदर्शन केले जाते.


जिज्ञासूंचे निवडक अभिप्राय

१. बुधा महाजन – ऐतिहासिक पारोळा किल्ल्याच्या (जिल्हा जळगाव) दुरवस्थेचे चांगले सूत्र हिंदु विधीज्ञ परिषदेने घेतले आहे.

२. दयाशंकर राजगोर – इस्लाम धर्मीय कुराणाचे अनुसरण करतात, ख्रिस्ती बायबलला मानतात, त्याचप्रमाणे हिंदू हे हिंदु धर्म, वेद-पुराण आणि भगवद्गीता यांचे अनुसरण करतात. हिंदूंनी काय करावे आणि काय करू नये, हे ठरवणारे साम्यवादी कोण आहेत ? आपण याचा विरोध केलाच पाहिजे.

३. पूनम साळेकर – ‘दाभोलकर टीम’ अंधश्रद्धा समितीमध्ये हिंदूंनाच लक्ष्य करते. हिंदु धर्मावर आघात होत आहेत. त्यामुळे या समितीवर बंदी घातली पाहिजे. धाडस असेल, तर या समितीने मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर कारवाई करून दाखवावी. प्रशासन आणि पोलीस यांच्या दबावामुळे हिंदू पुढे यायला घाबरतात. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पुष्कळ चांगली सूत्रे सांगितली.

४. अनिल धानोलकर – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या विचारांमुळे देशात निश्चित परिवर्तन होईल.