लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत महसूल आणि पोलीस या विभागांतील लाचखोर सर्वाधिक !

एकूण कारवाईच्या ४० टक्के कारवाई या दोन विभागांतच !

लाचखोरांवर वेळीच कठोर कारवाई न होण्याचे हे गंभीर परिणाम ! लाचखोरीमुळे पोखरल्या गेलेल्या सरकारी यंत्रणा कधी सुधारणार ? लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच या प्रकाराला आळा बसेल.

पुणे – राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल आणि पोलीस या विभागांतील लाचखोरांवर सर्वाधिक कारवाई केली. एकूण कारवाईपैकी ४० टक्के कारवाई या दोन विभागांतच झाली आहे. गेल्या ६ मासांत ८ विभागांत ३९४ सापळे रचून ५४१ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. यात ९७ लाख रुपयांची लाचेची रक्कम शासनाधीन करण्यात आली. महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी कार्यालय येथे सर्वाधिक म्हणजे ९३ सापळे रचून १३० जणांना कह्यात घेण्यात आले, तर पोलीस विभागात ८७ सापळे रचून १३१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या दोन विभागांपाठोपाठ महावितरण, पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि महापालिका विभागातही सापळे रचून लाचखोरांना कह्यात घेण्यात आले आहे. राज्यातील पोलीस, महसूल, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिका येथील प्रत्येकी एका अधिकार्‍यावर या वर्षी अपसंपदा जमवल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद केला आहे.