सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती

  • नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी

  • १६ जुलैपर्यंत अतीवृष्टीची शक्यता

रस्ते पाण्याखाली गेले

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेले दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाले दुथडी भरून वहात आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी शेतकरी मात्र सुखावला आहे. जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत अतीवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

भेडशी येथे अतीउत्साही चालक थोडक्यात वाचला

दोडामार्ग – दोडामार्ग-तिलारी राज्य मार्गावरील भेडशी येथील लहान पूल (कॉजवे) ११ जुलैला दुपारपासून पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक चालू आहे. १२ जुलैला सकाळी दोडामार्ग येथून तिलारीला जाणार्‍या एका टेम्पोचालकाने  भेडशी ‘कॉजवे’वरील पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र थोडे अंतर गेल्यावर टेम्पो पाण्यात अडकला. याची माहिती मिळताच भेडशी येथील स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्नांनी टेम्पो पाण्याबाहेर काढला अन्यथा अनर्थ झाला असता.

मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग कोसळल्याने करूळ घाट वाहतुकीसाठी बंद

वैभववाडी – तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी, नाले यांना पूर आला आहे. कुसुर-सुतारवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्याने कुसुर-भुईबावडा वाहतूक ठप्प झाली. वैभववाडी-उंबर्डे मार्गावर झाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अतीवृष्टीमुळे करूळ घाटातील एका मोरीचा कठडा ढासळला आहे. प्रारंभी या मार्गावरून एकेरी वाहतूक चालू ठेवण्यात आली होती; मात्र नंतर २६ जुलैपर्यंत हा घाटरस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाट यांमार्गे वळवण्यात आली आहे, अशी माहिती वैभववाडीचे  पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली. (केवळ मुसळधार पावसामुळे एका मोरीचा कठडा ढासळल्यावर घाट १५ दिवस बंद ठेवावा लागतो, तर आपत्काळात किंवा युद्धकाळात प्रशासन तत्परतेने वाहतूक पूर्ववत् करू शकेल का ? – संपादक)

खारेपाटणमध्ये पूरजन्य स्थिती

पूरजन्य स्थिती (संग्रहित चित्र )

कणकवली – शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून यामुळे खारेपाटण गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खारेपाटण बाजारपेठ ते बंदरवाडी, सम्यकनगर, कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता, तसेच मुंबई-गोवा महामार्गावरून खारेपाटण शहरात येणारा मुख्य रस्ता,  खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण बसस्थानक रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ठप्प झाली अहे. खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारतीचा तळमजला पूर्ण पाण्याखाली बुडाला आहे. खारेपाटण येथील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

देवगड आणि कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे, तर ग्रामीण भागासह शहरी भागातील काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत.