|
मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – ईश्वर, धर्म, जाती या संकल्पना म्हणजे व्यवस्थेच्या धुरिणांनी गरीब समाजाच्या बुद्धीवर केलेले आक्रमण होय. यांद्वारेच व्यवस्थेचे धुरीण धर्मबंधनाद्वारे विचार, शिक्षण आणि मेंदू यांवर बंदी घालतात. माणसांमध्ये मूर्खपणाची भावना वाढवून त्यांना नियंत्रणात ठेवू पहातात. ईश्वर, धर्म, जाती आदी अविचारांचे गुलाम होणे; म्हणजेच अंधश्रद्धाळू होणे आहे. ईश्वर, धर्म आदींपासून स्वतंत्र होणे, हेच खरे स्वातंत्र्य होय, अशी मुक्ताफळे नागपूर येथील लेखक यशवंत मनोहर यांनी अंनिसच्या व्यासपिठावरून उधळली. ११ जुलै या दिवशी अंनिसच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या मासिकाच्या ‘ऑनलाईन’ प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करतांना मनोहर बोलत होते. (एकीकडे ‘आमचा देवा-धर्माला विरोध नाही’, असे म्हणून श्रद्धाळू लोकांना जाळ्यात फसवायचे आणि दुसरीकडे ईश्वराची उपासना न करण्याचे आवाहन करायचे, असा दुतोंडीपणा ही अंनिसची जुनी कार्यपद्धत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धेचे भंजन करायचे, हे अंनिसचे छुपे षड्यंत्र हिंदू ओळखून आहेत. – संपादक) अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
मूल जन्माला येते, तेव्हा ते स्वतंत्र असते, व्यवस्थेचे धुरीण त्याला पारतांत्रिक करतात. यासाठी स्वत:मध्ये विज्ञाननिष्ठा निर्माण करावी लागते. माणूस विज्ञानवादी झाला, तर ताणतणाव आदी सर्व समस्या सुटू शकतात. (विज्ञाननिष्ठ समजल्या जाणार्या युरोपीय देशांमध्ये ताणतणावामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेत तर लक्षावधी नागरिक हे मानसिक आजारांना बळी पडलेले आहेत. त्यामुळेच मन:शांतीसाठी पाश्चात्त्य लोक हिंदु संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. मन:शांती मिळवून देणारे ‘अध्यात्म’ हेच एकमेव शास्त्र आहे; मात्र या विज्ञानभ्रष्ट अंधश्रद्धाळू लोकांना हे कोण समजावणार ? – संपादक) धर्माच्या जोखडाखालील समाज मानसिकदृष्ट्या रुग्ण असून आपल्याला त्याला मानसिक आरोग्य द्यायचे आहे. (स्वत:च्या बुद्धीची दिवाळखोरी स्पष्ट करणारे वक्तव्य ! – संपादक)
सद्सद्विवेक हे सत्य असून तीच विज्ञाननिष्ठा होय. मनुष्य त्याच्यातील विवेकाद्वारेच भित्र्या माणसाने निर्माण केलेले ईश्वर, धर्म आणि रूढी नाकारतो अन् विद्रोह करतो. (केवळ पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांच्याद्वारे जे समजते, त्यासच प्रमाण मानणार्या या अंधश्रद्धावाल्यांना त्यांहून सूक्ष्म असलेले अध्यात्मशास्त्र, सूक्ष्मातीसूक्ष्म असणारा ईश्वर कसा समजणार ? विज्ञानाला जिथे मन आणि बुद्धी यांच्या अस्तित्वाचा शोध घेता आलेला नाही, तिथे ते आत्म्याचा शोध कसा घेणार ? त्यासाठी साधना करावी लागते. याचीही जाण नसलेले स्वत:ला विज्ञाननिष्ठ समजून स्वत:चे अज्ञान पाजळतात, यापेक्षा मोठा विनोद तो कोणता ? – संपादक)
(म्हणे) ‘थाळी वाजवून कोरोना घालवणार्या नेतृत्वाचाही आपल्याला प्रतिवाद करता यायला हवा !’
स्वत:ची संघटना सांभाळू न शकणार्या अविनाश पाटील यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
कोरोनाच्या काळात विज्ञानाचा आधार भासवून पूजा, यज्ञ आदी धार्मिक गोष्टी करून कोरोना जाईल, असे अनेकांना वाटले. टाळी-थाळी वाजवून कोरोना घालवणार्या सध्याच्या नेतृत्वाचाही आपल्याला समर्पक प्रतिवाद करता यायला हवा. सध्याची प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे ही पुरोगामित्वाला फाटा देणारी आहेत. सत्ताकेंद्रीत लोकही विवेकाला दूर सारत हुकूमशहांप्रमाणे समूह चालवत आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांना स्वत:च्या नियंत्रणात घेतले आहे. या सर्वांचा प्रतिवाद करण्यासाठी स्वत:चे मुखपत्र काढत आहोत. (कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा ही त्याज्यच होय; मात्र अंनिससारखी नास्तिक संघटना अंधश्रद्धेच्या नावाखाली ईश्वराच्या उपासनेला म्हणजेच श्रद्धेला विरोध करते. संत तुकाराम महाराज आदी संतांची उदाहरणे आपल्या सोयीनुसार द्यायची आणि त्यांनी केलेली ईश्वरभक्ती मात्र नाकारायची, असा वैचारिक गोंधळ असलेली अंनिस लोकांचे काय प्रबोधन करणार ? – संपादक)