गोव्यात कोरोनाच्या ‘डेल्टा’ विषाणूचे आणखी ४५ रुग्ण आढळले

गोव्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा एकही रुग्ण नाही

पणजी, १० जुलै (वार्ता.) – कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्यांचे नमुने प्रत्येक पंधरवड्याला ‘कोविड-१९ जिनोमी सिक्वेसिंग’साठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले जातात. यांपैकी नुकताच ४७ चाचण्यांचा अहवाल गोवा शासनाला प्राप्त झाला आहे. यामध्ये ४५ रुग्णांना कोरोनाच्या ‘डेल्टा’ विषाणूचा, तर २ रुग्णांना कोरोनाच्या ‘कापा’ विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत यांविषयक १२० जणांचा चाचणीअहवाल शासनाला प्राप्त झालेला आहे आणि यामध्ये कोरोनाच्या ‘डेल्टा’ विषाणूचे १०९, ‘कापा’ विषाणूचे १०, तर ‘अल्फा’ विषाणूचा १ रुग्ण आढळला आहे. २ जणांच्या चाचण्यांचा अहवाल येणे शेष आहे. गोव्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा एकही रुग्ण अजूनपर्यंत सापडलेला नाही.