गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याचे उदाहरण ! चोरांना कठोर शिक्षा न झाल्यामुळेच ते परत परत चोरी करत आहेत, असेच म्हणावे लागेल. चोर सराईत होणे हे पोलिसांचे अपयश नव्हे का ?
पुणे, ९ जुलै – येथील कोथरूडमधील पंचरत्न सोसायटीतील एका सदनिकेमध्ये ५ जुलैच्या मध्यरात्री २ वाजता दरोडा टाकून पळून जात असतांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. पोलिसांवर आक्रमण करणार्या आणि चोरीचे १२५ हून अधिक गुन्हे नोंद असलेल्या चोरट्यांना न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बल्लूसिंह टाक आणि उजालासिंह टाक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बल्लूसिंह याच्यावर चोरीसह विविध प्रकारचे ६३ आणि उजालासिंह याच्यावर ७२ गुन्हे नोंद आहेत. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, वर्ष २००८ पासून ते घरफोडीसारखे गुन्हे करत असल्याचे सरकारी अधिवक्ता किरण बेंडभ यांनी न्यायालयात सांगितले.
पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले होते. त्यानंतर ७ जुलै या दिवशी त्यांना पुन्हा न्यायालयात उपस्थित केले.